पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:19 AM2019-12-28T03:19:59+5:302019-12-28T03:20:05+5:30
प्रशासनाचा प्रस्ताव : स्थायी समितीचा विरोध
मुंबई : पालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. याबाबतचे परिपत्रक प्रमुख रुग्णालयांमध्ये पाठविले आहे. नवीन नियम कनिष्ठ डॉक्टरांवर अन्यायकारक असल्याची नाराजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी शुक्रवारी स्थायीच्या बैठकीत व्यक्त केली.
हरकतीचा मुद्द्याद्वारे त्यांनी या गंभीर विषयाकडे स्थायी समितीचे लक्ष वेधले. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे वय यापूर्वी ५८ होते. बदल करून हे वय ६२ करण्यात आले. मात्र तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने अनुभवी डॉक्टरांना सेवेतून निवृत्त करण्यास पालिका प्रशासन तयार नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. केईएम, सायन आणि नायर या प्रमुख रुग्णालयांमध्ये असे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. असे होत राहिले तर हे तरुण डॉक्टर राजीनामे देतील, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या या परिपत्रकाला म्युनिसिपल मेडिकल टीचर्स असोसिएशन आॅफ एम.सी.जी.एम. डेंटल, ओटी पिटी इन्स्टिट्यूशन या संघटनेनेही विरोध केला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून उत्तर येईपर्यंत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राऊत यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला. मात्र ६४ वय वाढविण्याची प्रक्रिया ही केवळ मेडिकल कॉलेजमध्ये राबवली गेल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.