अनधिकृत बांधकामांवर आकाशातून नजर ठेवण्यासाठी पालिकेने नेमली एजन्सी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:34 AM2023-12-23T09:34:56+5:302023-12-23T09:35:59+5:30
जुन्या नकाशांचे, छायाचित्रे एकत्रिकरणाचे काम सुरू.
मुंबई : अनधिकृत बांधकामांची समस्या ही मुंबई महापालिकेची मोठी डोकेदुखी झाली आहे. मात्र कोणत्याही भागात उभे राहिलेले बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे, याचा शोध घेणे आता सोपे होणार आहे. आता ‘आकाशातील डोळे’ अर्थातच उपग्रहाच्या माध्यमातून अशा बांधकामाचा शोध घेतला जाणार आहे.
त्या माध्यमातून गेल्या काही वर्षांतील जुने नकाशे आणि उपग्रहाच्या माध्यमातून टिपलेली छायाचित्रे यांचा तुलनात्मक अभ्यासदेखील होणार आहे. त्यामुळे नव्याने उभे राहिलेले बांधकाम अनधिकृत आहे की नाही, याची माहिती मिळेल.
सध्या विविध वर्षांतील जुन्या नकाशांचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. उपग्रहाच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी पालिकेने एजन्सी नेमली आहे. प्रत्येक वॉर्डात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर फोफावली आहेत. एखादा प्रकल्प राबवायचा असल्यास त्याही ठिकाणी अशी बांधकामे आढळून येऊ लागली आहेत. त्यामुळे प्रकल्प राबविताना अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा दृष्टीने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. अतिक्रमित जागा मोकळ्या करून त्या पालिकेकडे हस्तांतरित कराव्या, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
या बांधकामांवर कारवाई करताना पालिकेला अनेकदा न्यायालयीन लढायाही लढाव्या लागतात.
एकूणच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी उपग्रहप्रणालीची मदत घेतली जाणार आहे.
येत्या काही दिवसांत या यंत्रणेच्या माध्यमातून माहिती संकलित करणे आणि पडताळणी करणे यावर काम सुरू होईल.
अशी मिळेल माहिती ?
पालिकेकडे विविध विभागांतील जुने नकाशे आहेत. त्यावरून त्याकाळी तिथे कोणती बांधकामे होती हे कळते.
मात्र दरम्यानच्या काळात तिथे नवी बांधकामे झाली आहेत का, याची छायाचित्रे उपग्रहाच्या माध्यमातून मिळतील. नवे बांधकाम उभे राहिले असल्यास त्याबाबतची माहिती संबंधित विभाग कार्यालय आणि इमारत प्रस्ताव विभागाला पाठवली जाईल.
या बांधकामांना संबंधित विभागांनी परवानगी दिली आहे की नाही त्यावरून त्या बांधकामाबाबत स्पष्टता येईल. बांधकाम अनधिकृत असल्याचे आढळल्यास पुढील कारवाई होईल.