एजंटने दिला बोगस पासपोर्ट; मस्कतहून मुंबईला आलेल्या महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 03:41 PM2018-07-02T15:41:06+5:302018-07-02T15:42:43+5:30
बोगस पासपोर्टच्या आधारे ४२ वर्षीय झाहेदा शेख या महिलेने मस्कत ते मुंबई केला प्रवास
मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरून काल एका ४२ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. मस्कतहून मुंबईला आलेल्या या महिलेकडे बोगस पासपोर्ट असल्याचं निदर्शनास आल्यानं सहार पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.
बोगस पासपोर्टच्या आधारे ४२ वर्षीय झाहेदा शेख या महिलेने मस्कत ते मुंबई असा प्रवास केला. झाहेदा हि मूळची औरंगाबादची असून २००५ पासून ती दुबईत घरकाम करत होती. मात्र, तिच्या पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपली होती. त्यामुळे तिला दुबईतील एका एजंटला तिला पासपोर्ट बनवून दिला असे शेख हिने सहार पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिने मस्कत ते मुंबई असा प्रवास करत केला आणि मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळावर काल दाखल झाली. त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिच्या पासपोर्टबाबत संशय आल्याने त्यांनी तिचा पासपोर्ट स्कॅन केला असता पासपोर्टधारक महिलेचा फोटो वेगळा असल्याचे आढळून आले. शेखला एजंटने दिलेला पासपोर्ट हा मूळ केरळातील तिरुवनंतपूरममधील शीबा राजेंद्रन या महिलेच्या नावावर पासपोर्ट विभागाने जारी केलेला असल्याचे तपासात उघड झाले आहे. मूळ पासपोर्टशी छेडछाड करत दुबईतील एजंटने शेखचा फोटो शीबाच्या फोटोवर लावून इतर फेरफार करून तो पासपोर्ट शेखला देण्यात आला होता. या बोगस पासपोर्टच्याआधारे शेखने मस्कत ते मुंबई प्रवास केला. मात्र, इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा सतर्कतेमुळे हा गुन्हा उघड झाला. या अधिकाऱ्यांनी सहार पोलिसांच्या ताब्यात झाहेदा शेखला दिले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.