Join us

एजंटसची परीक्षा 22 नोव्हेंबरला; राज्यातील 19 केंद्रांवर ऑनलाईन  होणाऱ्या या परीक्षेला बसणार 5592  पात्र उमेदवार 

By सचिन लुंगसे | Published: November 17, 2023 11:52 AM

आतापर्यंत 2 वेळा झालेल्या परीक्षेत 3217 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत.

मुंबई - स्थावर संपदा क्षेत्रातील  आणखी 5592 उमेदवार अपेक्षित प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून 22 नोव्हेंबर रोजी राज्यात 19 केंद्रांवर ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यात मुंबई महाप्रदेशातील 2732, पुणे 2104, नागपूर 592, नाशिक 78, कोल्हापूर 26, औरंगाबाद 20 , अहमदनगर 8,अकोला 6, सोलापूर 5, अमरावती , नांदेड, सांगली आणि सातारा प्रत्येकी 3 ,चंद्रपूर 2 , धुळे ,लातूर ,  पंढरपूर आणि वर्धा येथील प्रत्येकी 1 उमेदवार सहभागी होणार आहेत. 

आतापर्यंत 2 वेळा झालेल्या परीक्षेत 3217 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत.  राज्यात सुमारे 45 हजार एजंटस नोंदणीकृत होते. यापैकी 13 हजार एजंटसनी नुतनीकरण न केल्याने राज्यात सध्या 32 हजार एजंटस कार्यरत आहेत. स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच  मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना  रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.

त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) चटई क्षेत्र,  दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक  माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच  महारेराने  हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.

टॅग्स :परीक्षा