मुंबई - स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या 22 नोव्हेंबरला झालेल्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 4954 पैकी 4461 उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या दुसऱ्या परीक्षेचा निकाल 89% लागला आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल 96% आणि दुसर्या परीक्षेच्या निकाल 93% लागला होता.
परीक्षेला 4954 उमेदवार बसले होते आणि 4461 यशस्वी झाले आहेत. यात 3803 पुरूष आणि 658 महिलांचा समावेश आहे. यापैकी 200 उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून 10 उमेदवारांनी सत्तरी ओलांडलेली आहे तर दोन जण 80 च्यावर आहेत. नागपूरचे एक उमेदवार तब्बल 85 वर्षांचे आणि दुसरे पुण्याचे उमेदवार 83 वर्षांचे आहेत. हे या निकालाचे वेगळे वैशिष्ट्य आहे.
निकालात मुंबईच्या पल्लवी उपाध्याय, ठाण्याचे अनिलकुमार खंडेलवाल आणि रायगडचे सनी दुग्गल या तिघांनी 98% गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. तिन्ही परीक्षांमधून आतापर्यंत 7678 उमेदवार एजंटससाठी पात्र ठरले आहेत. यात आताच्या परीक्षेत 4461, पहिल्या परीक्षेत 405 आणि दुसऱ्या परीक्षेत 2812 असे एकूण 4461 उमेदवार पात्र ठरले आहेत. महारेराने 10 जानेवारी 23 च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे.
१) स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
२) बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात.
३) ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते.
४) एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.
५) त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी.
६) या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.