एजंटसच म्हणतात, "आमची एजंट म्हणून नोंदणी रद्द करा"
By सचिन लुंगसे | Published: May 25, 2024 05:26 PM2024-05-25T17:26:13+5:302024-05-25T17:26:57+5:30
एजंटसनी यासाठी महारेराचे संचालक (नोंदणी) यांच्याकडे मेलवर अर्ज करायचा आहे.
मुंबई : महारेराने सुमारे २० हजार एजंटसची नोंदणी वर्षभरासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे अनेक एजंटसनी त्यांची एजंट म्हणून नोंदणी रद्द करण्याची विनंती महारेराकडे केली आहे. ही नोंदणी रद्द करता यावी यासाठी महारेराने कार्यपद्धती जाहीर केली आहे.
संबंधित एजंटसनी यासाठी महारेराचे संचालक (नोंदणी) यांच्याकडे मेलवर अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्जदार एजंटला कुठल्याही बिल्डरने अधिकृत एजंटस म्हणून नेमलेले नसावे. त्यांनी कुठल्याही प्रकल्पात व्यवहार केलेला नसावा. असल्यास त्याबाबत तक्रार नसावी. गेल्या दोन वर्षांचा ताळेबंद त्यांनी वेळोवेळी सादर केलेला असावा.
ताळेबंद सादर केलेला नसल्यास त्यांनी त्यांच्या लेटरहेडवर सादर न करण्याची कारणे देऊन त्याबाबतचा तपशील देणे अपेक्षित आहे. परवाना रद्द करण्याची परवानगी दिलेल्या एजंटबाबत काही तक्रार असल्यास त्याबाबत महारेराकडे तक्रार करता येईल. महारेराने तक्रारीच्या अनुषंगाने घेतलेला निर्णय संबंधित एजंटसवर बंधनकारक राहणार आहे, अशा आशयाचे परिपत्रक महारेराने जाहीर केले आहे.
१ जानेवारीनंतर स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसनी महारेराने विहित केलेले प्रशिक्षण पूर्ण करून, परीक्षा देऊन प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदविल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही, महारेराने हे जाहीर केले आहे. सुमारे २० हजार एजंटसनी या अटींची पूर्तता केली नाही. केली असल्यास सक्षमता प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदवलेले नाही. त्यामुळे २० हजार एजंटसची नोंदणी स्थगित करण्यात आली.
एजंटसना रेरा कायद्यातील तरतुदी माहीत असायला हव्यात. ज्यात बिल्डर आणि प्रकल्प याची विश्वासार्ह प्राथमिक माहिती, प्रकल्पाच्या जमिनीच्या हक्काची वैध्यता, रेरा नियमानुसार चटई क्षेत्र, इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या तत्सम मंजुऱ्या, प्रकल्पाच्या विरुद्ध, बिल्डरची आर्थिक क्षमता याबाबी कशा मिळवायच्या, समजून घ्यायच्या हे त्यांना माहीत असायला हवे. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून महारेराने प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.
- अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा