मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षाने हिंदुत्वाचे वळण घेतल्यानंतरचा हा पहिलाच मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडियातील नेहमीच्या प्रचारासोबतच यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि वॉर्डावॉर्डातून फ्लेक्स आणि बॅनरद्वारे नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रविवार, ९ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, आझाद मैदान येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होईल. या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. जास्तीतजास्त लोकांना मोर्चात आणण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियातील प्रचार अधिक परिणामकारक करण्यासाठी घुसखोरांच्या प्रश्नांवर व्हिडीओ बनविले जात आहेत. त्यासाठी राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या चित्रफिती, त्यात घुसखोरांच्या प्रश्नांवर राज यांनी आजवर मांडलेले विचार समोर ठेवण्यात येत आहेत. शिवाय, ‘भारत म्हणजे धर्मशाळा नाही,’ असे सांगत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. टी-शर्ट, फ्लेक्स आणि बॅनरबाजीवरही भर देण्यात येत आहे.
एरवी, निवडणूक प्रचारादरम्यान दिसणारे प्रचाराचे टेम्पोसुद्धा सध्या मनसेने मैदानात उतरविले आहे. विशेषत: मनसेचा जोर असणाºया भागांत टेम्पोवरून लोकांना आवाहन करण्यात येत आहे. जिथे शक्य आहे, तिथे चौकसभा घेण्याचा सपाटा लावला आहे.
नोटिसांना घाबरत नाही - देशपांडे
मनसेने मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून चौकसभा घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल, अशा आशयाची नोटीस पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. यावर, विनापरवाना रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्यांना पोलीस हात लावायला तयार नाहीत, पण आम्हाला नोटिसा पाठविल्या जात आहेत. मनसेच्या स्थापनेपासून अशा नोटिसा आम्ही बघत आलो आहोत. त्यामुळे अशा नोटिसांना घाबरत नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत सांगितले.