Join us

सीमावादावरून आक्रमक, संजय राऊतानंतर अजित पवारांही कडाडले; बोम्मईंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 1:39 PM

अजित पवार यांनीही मुख्यमंत्री बोम्मईंच्या विधानाचा समाचार घेत त्यांना थेट इशाराच दिला आहे. एक इंचही जमीन ठेऊ देणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी बोम्मईंना प्रत्युत्तर दिलंय. 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतून आग लावण्याचं काम बोम्मई करतायेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ते जे काही बोलले तेच बोम्मई मानायला तयार नाहीत. ते आमची संस्कृती काढतायेत. आम्हाला त्यांनी संस्कृती, संस्कार, भाषा शिकवण्याची गरज नाही. बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तोंडं बंद आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी कडाडून भाजपा-शिंदे सरकारचा समाचार घेतला होता. आता, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री बोम्मईंच्या विधानाचा समाचार घेत त्यांना थेट इशाराच दिला आहे. एक इंचही जमीन ठेऊ देणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी बोम्मईंना प्रत्युत्तर दिलंय. 

महाराष्ट्राबरोबर असलेल्या सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटकच्या हिताचे संपूर्ण रक्षण करण्याचा ठराव कर्नाटक विधानसभेने गुरुवारी एकमताने संमत केला. हा ठराव कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत मांडला. सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रातील नेते ज्या पद्धतीने वक्तव्ये करीत आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांवर आवश्यकता भासल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही बोम्मई यांनी दिला. त्यानंतर, महाराष्ट्रातील नेतेही संतप्त झाल्याचं दिसून आलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी अगोदर बोम्मईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर, आता अजित पवार यांनीही थेट इशारा दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या, मग एक इंच ही जमीन ठेऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला इशारा आहे, असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बोम्मईंना थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक वाद नाही. हा वाद राजकीय फायद्यासाठी बोम्मई यांनी बाहेर काढला. आम्ही चीनचे एजेंट असाल तर तुम्ही कुणाचे एजेंट आहात? देशाच्या गृहमंत्र्यांसमोर जी गोष्ट मान्य केली ती मानायला तुम्ही तयार नाही. आम्हालाही घटनेने अधिकार दिलाय. महाराष्ट्रातील आमच्या गावांवर हक्क सांगता त्याला विरोध करण्याचा अधिकार आम्हाला आहे. महाराष्ट्र सरकारनंही अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात आणि बोम्मई यांच्यावर ठराव आहे. बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल खटला दाखल करा. २० लाख सीमावासियांना तुम्ही गुन्हेगार ठरवाल. बोम्मई यांच्यावर खटला दाखल करा, अशी मागणीच संजय राऊत यांनी केलीय. 

टॅग्स :अजित पवारकर्नाटकसंजय राऊतमुख्यमंत्री