म्हाडाविरोधात गिरणी कामगारांचे आक्रमक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:28 AM2018-07-24T03:28:58+5:302018-07-24T03:29:14+5:30

पाच संघटना एकवटल्या; सरकारविरोधात एकत्रित लढा देण्याचा बैठकीत निर्धार

The aggressive strategy of mill workers against MHADA | म्हाडाविरोधात गिरणी कामगारांचे आक्रमक धोरण

म्हाडाविरोधात गिरणी कामगारांचे आक्रमक धोरण

Next

मुंबई : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगारांनी आणि त्यांच्या संघटनांनी आता आक्रमक धोरण स्विकारले आहे. म्हाडाच्या गलथान कारभाराविरोधात लढण्यासाठी पाच संघटना एकत्र येऊन म्हाडा आणि सरकारविरोधात लढा देणार आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या या पाचही संघटनांच्या बैठकीत आगामी लढ्याची दिशा ठरवण्यात आली. त्यामुळे हक्काची घरे मिळवण्यासाठी सर्व गिरणी कामगार संघटना एकवटल्याने सरकारची चांगलीच कोंडी होणार आहे.
या बैठकीत राष्ट्रीय मिल मजदूर संघ, रयतराज कामगार संघटना, गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच या गिरणी कामगारांसाठी लढणाऱ्या पाच महत्वाच्या कामगार संघटना सामील झाल्या होत्या. ज्या कामगारांना सोेडतीत घरे लागली आहेत, बँकेच्या कर्जाचे हफ्तेही भरण्यास सुरवात केली आहे, असे कामगार म्हाडामध्ये अनेक वेळा घरांसाठी खेटे मारून हैराण झाले आहेत. मात्र, त्याचा उपयोग शून्य झाला. म्हाडाकडून योग्य ती मदत करण्यात आली नाही, असा या कामगारांचा आरोप आहे. घरे तर मिळाली नाहीच उलट दंड भरावा लागतो आहे. एमएमआरडीए, बॉम्बे डार्इंग आणि श्रीनीवास मिलमधील बांधून तयार असलेल्या घरांची त्वरीत लॉटरी काढण्यात यावी, अशा अनेक मागण्यांवर बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली.

सरकारने गिरणी कामगारांच्या घरांच्या जिव्हाळ््याच्या प्रश्नावर निर्णयात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे. गेल्या ४ वर्षात गिरणी कामगारांना पोकळ आश्वासन देण्यापलीकडे सरकारने काहीही केलेले नाही. त्यामुळे सरकारच्या या धरसोड वृत्तीविरोधात आम्हा सर्वांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हाडाच्या गलथान कारभाराला आता प्रखर आंदोलन करून आम्ही उत्तर देणार आहोत. - गोविंद मोहिते, सरचिटणीस, राष्ट्रीय मिल मजदूर संघ.

२६ जूलैला आक्रोश मोर्चा
घरांच्या या प्रश्नावर २६ जुलैला सकाळी ११ वाजता या सर्व संघटनाचे प्रमुख नेते आणि गिरणी कामगार म्हाडावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत.

Web Title: The aggressive strategy of mill workers against MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.