मुंबई : पोलीस भरतीला स्थगिती दिल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजचे तरुण उमेदवार आणि विद्यार्थी हेच उद्याचे मतदार आहेत. त्यामुळे सरकारने भरती प्रक्रिया सुरू करणे आणि रद्द करण्याचा खेळ करू नये. अन्यथा, सरकारला मतदानातून उत्तर देण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती पुढे ढकलल्याचा निर्णय जाहीर झाल्यावर इच्छुक उमेदवार आणि विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या आधीही सरकारकडून जिल्हा परिषद भरती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सरकारला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील हजारो तरुण पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. काही तरुणांनी तर पोलीस भरतीसाठी आंदोलनही केले होते. मात्र, अचानक आलेल्या स्थगितीमुळे तरुणांचा हिरमोड झाला आहे.
याआधी जिल्हा परिषद भरतीही झाली होती रद्द
या आधी जिल्हा परिषदांतील १३ हजार ५१४ रिक्त पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली होती. या सर्व पदांसाठी नव्याने भरती होणार असून उमेदवारांना आता पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तरुणांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आंदोलनाच्या तारखा लवकरच जाहीर करणार
रद्द झालेली पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती महिन्याभराच्या आत घेण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत लवकरच राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल. आंदोलनाच्या तारखा आम्ही लवकरच जाहीर करू, असे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे.