‘आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला नव्याने करावा’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 08:00 AM2024-02-04T08:00:20+5:302024-02-04T08:00:50+5:30
आंबेडकर यांना आघाडीत सामील करून घेण्याआधीच जागा वाटपाची जवळपास ३५ ते ३८ जागांवर चर्चा पूर्ण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला असतानाच वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नव्याने फॉर्म्युला निश्चित करा, असा आग्रह धरला आहे.
आंबेडकर यांना आघाडीत सामील करून घेण्याआधीच जागा वाटपाची जवळपास ३५ ते ३८ जागांवर चर्चा पूर्ण झाली होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांना परस्पर केलेले हे जागा वाटप मान्य नाही. शुक्रवारच्या बैठकीत त्यांनी किमान समान कार्यक्रम निश्चित केला जावा, तो मान्य झाल्यावर जागा वाटपाचा फाॅर्म्युला निश्चित करावा, असा आग्रह धरला आहे.
किती जागा मागणार?
जागा वाटपावर नव्याने चर्चा करण्यास शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष उत्सुक नाहीत. शिवसेनेला जागा वाटपात अधिक जागांवर निवडणूक लढण्याबाबत आणि त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी जागा वाटपाची रचना असल्याने आंबेडकरांना शिवसेनेकडूनच जागांची अपेक्षा आहे. आंबेडकर यांची नेमकी किती जागा लढवण्याची इच्छा आहे, हे उघडपणे सांगण्याची आवश्यकता आहे. पुढील १५ दिवसांत जागा वाटपाची चर्चा पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे आघाडीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.