Join us

'अघोरा टेक' दाखवणार अघोरी समाजातील परिवर्तनाची झलक

By संजय घावरे | Published: December 19, 2023 8:31 PM

अरिजॉय भट्टाचार्य यांच्या कलाकृतींमध्ये घडणार अघोरींच्या सकारात्मक पैलूंचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चित्रकार संजय भट्टाचार्य यांचे पुत्र अरिजॉय भट्टाचार्य यांचे 'अघोरा टेक' हे नवीन चित्र प्रदर्शन कलाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. या प्रदर्शनाद्वारे अरिजॉय यांनी अघोरी समाजातील परिवर्तन सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन भिन्न जगांचा संगम या चित्रांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

काळा घोडा येथील सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत 'अघोरा टेक' भरवण्यात येणार आहे. या कलाकृतीत दोन भिन्न जगांचे मिश्रण पाहायला मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे फ्रँक आंद्रे जॅमे यांच्या 'तंत्र सॉन्ग' या पुस्तकात नोंद केलेली अतिशय साधी अशी राजस्थानमधील तांत्रिक चित्रे आणि दुसरे म्हणजे प्रख्यात क्रॉट्रॉक बँड क्राफ्टवर्कच्या कलाकृतीचे उदाहरण असलेल्या बौहॉस (एक जर्मन कलात्मक चळवळ) शैलीतील भौमितीय अचूकता या दोन्ही गोष्टींचा मिलाफ या चित्रांमध्ये घडल्याचे पाहायला मिळेल. 'अघोरा'चे अनुयायी सामान्यपणे 'अघोरी' नावाने ओळखले जातात. अरिजॉय यांनी या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्या सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकृत ग्रंथातून प्रेरणा घेऊन त्यांनी 'अघोरा' प्रतिनिधित्व करत असलेल्या उस्फुर्त मार्गाचा शोध घेतला आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास 'अघोरा'चा संबंध विषम अशा प्रथा, रीतिरिवाज आणि मृत देहाच्या अंतिम क्रियाकर्मांशी जोडला जातो, पण 'अघोरा टेक' हे प्रदर्शन मात्र आजच्या काळात आधुनिक संतांद्वारे केल्या जाणाऱ्या परोपकारी कार्याची एक वेगळी दृष्टी मांडते. या संदर्भात अरिजॉय म्हणाले की, आजच्या काळातील साधक हे अस्वस्थ करणाऱ्या अर्थापासून अतिशय दूर असूनही सक्रियपण समाज कल्याणाच्या कार्यात आपले योगदान देत असतात. वंचितांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ते मदत करतात. त्यात कुष्ठरोग्यांची काळजी घेणे आणि त्यांच्यावर उपचार करणे या गोष्टींचा देखील समावेश असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :मुंबई