Join us

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिवास धोका होण्यासाठी अघोरी जादूटोणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:35 AM

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जव्हार : राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला. मात्र, अजूनही अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी याच अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जिवाला धोका व्हावा, अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. अटक केलेले इसम हे असा अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून, त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.

अटक केलेले कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा करणाऱ्या सूत्रधारांचा अधिक तपास करीत आहेत.