Join us

कृषी कायद्याविरोधातील आंदोलन वांद्र्यातच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी वांद्रे कुर्ला संकुलातील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर निघालेल्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी वांद्र्यातच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी वांद्रे कुर्ला संकुलातील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर निघालेल्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी वांद्र्यातच रोखून धरले. त्यानंतर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत, केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, लोक संघर्ष मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, एनएपीएम आदी संघटनांनी साेमवारी मोर्चाचा इशारा दिला होता. स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी, शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते. बीकेसीतील रिलायन्स कार्यालयावर जाण्यासाठी निघालेल्या मोर्चाला पोलिसांना वांद्र्यातच रोखून धरल्याने मोर्चेकरी संतप्त झाले.

आंदोलक रिलायन्स कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी ठाम होते, पण मुंबई पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेटिंग करून आंदोलकांना रोखून ठेवले. चिडलेल्या आंदोलकांनी बॅरिकेटिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर, उपस्थित नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच सभा घेण्यात आली. अंबानी-अदानीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच रिलायन्स कंपनीच्या जिओ कार्डांची होळी करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मूठभर भांडवलदारांसाठी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

...................................