लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढवण बंदराविराेधात मुंबईच्या कफ परेड ते डहाणू झाईपर्यंतचे कोळीवाडे बंद हाेेते. आंदोलनाला येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, पालघर, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्य.सह. संघ लि., आदिवासी एकता समिती व आदिवासी कष्टकरी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या बंदची हाक देण्यात आली होती.
मच्छीमार एकजुटीचा विजय असो, अशा घाेषणा देत ससून डाॅक, भाऊचा धक्का ही मोठी उलाढाल करणाऱ्या व्यापारी बंदरात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मार्केट बंद करून आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा दिल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी ‘लोकमत’ला दिली.
कुलाबा, कफ परेड, वरळी, खारदांडा, जूहू मोरागाव, वर्सोवा, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई हे मुंबईतील सर्व कोळीवाडे बंद हाेते. गावागावात साखळी, प्रभात फेऱ्या काढून तसेच सभा घेऊन केंद्र व राज्य सरकारचा निषेध केल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.
वाढवण बंदर विकसित झाल्यास मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील किमान ९००० ते १०००० हजार मासेमारी नौकाधारक व त्यावर अवलंबून किमान १० लाख नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. त्याचबरोबर शेतकरी, बागायतदार, डायमेकर्स, लहान उद्योग करणारे देशोधडीला लागतील, असा आंदाेलकांचा आराेप आहे.
.................................