Join us

औषध वितरकांचे आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 2:04 AM

१०० हून अधिक वितरकांनी १४ डिसेंबरपासून औषध वितरण केले बंद

मुंबई : राज्यातील १०० हून अधिक वितरकांनी १४ डिसेंबरपासून औषध वितरण बंद केले आहे. त्यापाठोपाठ आता स्थानिक पातळीवरील वितरकांनीही रुग्णालयांना औषधपुरवठा करण्यास नकार देत या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. चार वर्षांपासून थकीत असलेली देयके मिळाल्याशिवाय औषधे न देण्याचा निर्णय स्थानिक वितरकांनी घेतला आहे. त्यामुळे औषध वितरकांकडून राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.खरेदी कक्षाकडून तातडीने मंगळवारी औषध वितरकांची बैठक घेण्यात आली. हाफकिन बायोफार्मास्युटीकलचे संचालक डॉ. संदीप राठोड यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये राठोड यांनी राज्य सरकारकडून २०१९-२० च्या औषध खरेदीसंदर्भात नव्याने निधी आल्यानंतरच देयकांचे पैसे दिले जातील, असे सांगितले. हा निधी येण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राठोड यांनी दिलेल्या माहितीनंतर औषध वितरकांनी देयकांचे पैसे आल्याशिवाय औषधांचा पुरवठा सुरू करणार नसल्याचे धोरण कायम ठेवले. त्यामुळे वितरकांचे आंदोलन पुढील काही दिवस कायम राहणार आहे. देयके मंजूर केल्याशिवाय औषधांचा पुरवठा करण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच औषधे हवी असल्यास ‘पैसे घेऊन या आणि औषध न्या’ असे धोरण त्यांनी अवलंबले आहे. १६ डिसेंबरपासून उधारीवर औषधपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पैसे दिल्यावरच रुग्णालयांना औषधे मिळणार आहेत, अशी माहिती ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.औषधांची देयके तांत्रिक कारणांमुळे प्रलंबितnऔषध पुरवठादारांनी सादर केलेल्या व परिपूर्ण असलेल्या १२१ कोटी ७७ लाख ५२ हजार ५४८.६८ ची देयके गेल्या दोन महिन्यांत मंजूर करण्यात आली आहे. अन्य देयके तांत्रिक अडचणींमुळे तसेच पुरवठादारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे प्रलंबित आहेत.याबाबत पुरवठादारांना पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. पुरवठादारांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तसेच इतर आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर देयके अदा केली जातील. तसेच देयके पूर्ण आहेत, ती मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :औषधं