मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढत आहे तशी शहरातील रुग्णालयांत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाविषयी वाढणारी असंवेदनशीलताही वाढत असल्याचा ठपका ठेवत केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सकाळी ९ ३० वाजल्यापासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत कोविड रुग्णांचे मृतदेह ताब्यात घेणाऱ्या कर्मचाऱ्याना कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा पीपीई कीट्स पुरवले गेले नाहीत असा आरोप या आंदोलनातून केला जात आहे. याचमुळे करत आतापर्यंत शवागृहात काम करणारे ७ कर्मचारी ही पॉझिटिव्ह आल्याची माहिती ही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू अहवाल अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे त्यांचा मृतदेह ताब्यात मिळाला नाही. उलट कर्मचारी काम करीत नाहीत म्हणून अधिष्ठाता यांच्याकडून कर्मचाऱ्याची बदनामी होत असल्याने प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन कर्मचारी वर्गाबद्दल इतकी अनास्था का दाखवत आहे याचे उत्तर जाणून घेण्यासाठी, सादर कर्मचार्याच्या मृत्यूचा अहवाल देण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.रुग्णालयातील शवागृह भरले असून ते मोकळ्या जागेत ठेवण्याची वेळ आली आहे. या मृतदेहांचे काम उचलण्याचे काम कर्मचार्याना विनासंरक्षण करावे लागत आहे. या आधीच काही कर्मचारी याना कोरोनाची लागण झाली असून ती वाढल्यास जबाबदार कोण ? असा सवाल कर्मचारी विचारत आहेत. शिवाय,अनेक नातेवाईक शवगृहाबाहेर फिरत राहतात. त्यातून संसर्ग पसरण्याची शक्यता असते. या सर्व परिस्थितीवर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचे माहिती आंदोलन करणाऱ्या कर्माचारी यांनी दिली.