Join us

मागण्या मान्य झाल्याने नेस्को कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नेस्को कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था जोगेश्वरी पूर्व म्हाडाच्या वसाहतीत करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नेस्को कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था जोगेश्वरी पूर्व म्हाडाच्या वसाहतीत करण्यात आली होती. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची राहण्याची व्यवस्था तडकाफडकी गोरेगाव पूर्व आरेमधील न्यूझिलंड हॉस्टेलमध्ये करण्यात आली. याठिकाणी अनेक असुविधांचा सामना करावा लागत असल्यामुळे संतप्त झालेल्या येथील कर्मचाऱ्यांनी नेस्को कोविड सेंटरच्या आवारात रविवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत आंदोलन केले.

न्यूझिलंड हॉस्टेल हे सेंटरपासून लांब असून, जाण्या-येण्याला वेळ लागतो तसेच येथे कॉमन टॉयलेट असल्याने ते कर्मचाऱ्यांना अपुरे पडते. रात्री घरी गेल्यावर आम्ही १२ वाजता जेवत असून, जेवणाचा दर्जाही निकृष्ठ आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी होत्या.

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही बाब राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई व पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या कानावर घातली आणि याप्रकरणी त्यांना लक्ष घालण्यास सांगितले.

डॉ. दीपक सावंत यांनी म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्याशी संपर्क साधून ‘नेस्को’च्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था जोगेश्वरी पूर्व म्हाडाच्या वसाहतीत केली होती.

आंदोलनाची यशस्वी सांगता

नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रादे याच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मी स्वतः दुपारी या आंदोलनकर्त्यांना भेटले. कर्मचारी राहात असलेली जागा ‘म्हाडा’ला हवी होती. त्यामुळे येथील सुमारे २०० कर्मचारी आणि वॉर्डबॉय यांना पालिकेच्या पी दक्षिण वॉर्डने न्यूझिलंड हॉस्टेल, दिंडोशी येथे शिफ्ट केले होते. आता कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांची व्यवस्था जोगेश्वरी पूर्व म्हाडा वसाहतीतच करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या येण्या-जाण्यासाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून, जेवणाचा दर्जाही सुधारण्यात येईल, असे आश्वासन डॉ. नीलम अंद्रादे यांनी दिले आणि अखेर त्यांच्या प्रयत्नातून आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

-----------------------------