भाजपचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी दिला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने दुकाने, खासगी कार्यालयांसह अन्य सुविधा खुल्या केल्या जात आहेत. मात्र, उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याने मुंबईकरांना प्रवासासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत आहेत. लोकलमुळे मध्य किंवा पश्चिम रेल्वेने केवळ २५ रुपयांत सीएसएमटी किंवा चर्चगेटपर्यंत पोहोचता येते. पण, लोकल बंद असल्याने त्याच प्रवासासाठी अडीचशे रुपये खर्च करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. कल्याण, डोंबिवली ठाण्यातील लोकांना कामासाठी मुंबईत यायचे झाले तर रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. ७००-८०० रुपये खर्च करून टॅक्सी किंवा खासगी वाहनाने नाइलाजास्तव महागडा रस्ते प्रवास करण्याची वेळ आल्याचे दरेकर म्हणाले, तर बसच्या प्रवासात तीन-चार तासांचा वेळ वाया जात असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मार्केटमधील दुकानदार अशा हातावर पोट असलेल्या वर्गासाठी उपनगरीय लोकल उपलब्ध नाही. यामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत. महिन्याला जेमतेम १५-२० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, त्यातच महागड्या प्रवासाचा भार यामुळे घर कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण करायचे की प्रवास खर्च भागवयाचा, असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. त्यामुळे आठवड्याभरात जर राज्य सरकारकडून यासंदर्भात परवानगी दिली गेली नाही तर भाजपच्या वतीने बोरिवली, दादर, सीएसटी, चर्चगेट आदी प्रमुख रेल्वेस्थानकांवर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.