Join us

महिलांच्या प्रश्नांवर आझाद मैदानात आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:35 PM

आझाद मैदानात महिला हक्क परिषद तसेच धरणे आंदोलन करण्यात आले.

श्रीकांत जाधव, मुंबईमुंबईतील शहरी गरीब झोपडपट्ट्यांमधील महिलांशी संबंधित विविध समस्यांवर सरकारचे लक्षवेधण्यासाठी घर बचाओ, घर बनाओ आंदोलनाच्या नेत्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आझाद मैदानात महिला हक्क परिषद तसेच धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मेधा पाटकर यांनी सर्व गरीब वस्त्यांच्या समस्या, विस्थापन, रोगराई, मूलभूत सुविधा, रोजगार, या सर्व गोष्टींवर भाष्य केले. ज्येष्ठ विधी तज्ञ गायत्री सिंह यांनी परिषदेला संबोधित केले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोरडे यांनी धारावीतील झोपडपट्ट्यांच्या विस्थापनाबद्दल सांगितले. वर्षा विलास यांनी महिलांचे हक्क, त्यांची स्थिती आणि अनुभव व्यक्त केले. श्रमिक जनता संघाचे सचिव जगदीश खैरलिया यांनी महिला कामगारांची सुरक्षा आणि रोजगार उपलब्धता या विषयांवर भाषण केले. तर एनएपीएमचे राज्य समन्वयक संजय मंगला गोपाल यांनी राजकारणाच्या बदलत्या धोरणांमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाल्याचे अधोरेखित केले.  

यावेळी मालाड, गोराई येथील पाण्याची समस्या, सिद्धार्थनगरमधील शौचालयाची समस्या, मंडाळा वसाहतीमध्ये स्वयंविकास योजनेची मागणी, माहुलमधील प्रदूषणग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनात दिरंगाई, प्रदूषणग्रस्तांच्या पुनर्वसनावर तात्काळ तोडगा, कुटुंबांना रोजगार, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, अनाथ मुले व निराधार कुटुंबांना विशेष मदत देण्याची मागणी, पावसाळ्यात छोटे डोंगर, टेकडीच्या बाजूला स्थायिक झालेली कुटुंबे, डोगर कोसळून घरांचे नुकसान आणि मृत्यू टाळण्यासाठी आयआयटीच्या अहवालानंतर लोकांचा जीव व मालमत्ता वाचविण्याची मागणी, अन्न सुरक्षेअंतर्गत पुरेसा रेशन, दारूबंदी, मिठी नदीच्या उध्वस्त झालेल्या झोपडपट्टीतील पर्यायी घरापासून वंचित असलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :मुंबई