मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनस्थळी मंत्री अन् विरोधक आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 04:07 PM2018-11-13T16:07:29+5:302018-11-13T16:08:19+5:30
मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करत आहेत.
मुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करत आहेत.
मंगळवारी विरोधी पक्ष नेत्यांनी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. विरोधकांच्या आधीच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आझाद मैदानावर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमनेसामने आले.
मराठा समाजाचे गेले बारा दिवस आझाद मैदानात आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. अद्याप सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आणि उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
दुसरीकडे, कार्यकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ आणि योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी यावेळी दिले. याचबरोबर, मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला त्यांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गुराढोरांसह मुंबईत येणार
आर्थिक विवंचनेत सापडलेला शेतकरी सरकारी योजनांअभावी होरपळत आहे. म्हणूनच गुराढोरांसह आणि शेती साहित्य घेऊनच १५ नोव्हेंबरनंतर मराठा शेतकरी आणि शेतमजूर मुंबईवर धडक देईल, असे सकल मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले.
मराठा समाजाचे गेले १२ दिवस आझाद मैदानात आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. अद्याप सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही. आज राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते @AjitPawarSpeaks व विरोधी पक्षनेते @dhananjay_munde यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. pic.twitter.com/IkPVHrllhq
— NCP (@NCPspeaks) November 13, 2018
विभागनिहाय संवाद यात्रा
आंदोलनासाठी समाजाच्या जनजागृतीसाठी शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधणे,समाजात जागृती करणे,मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन करणे,तसेच मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी १६ नोव्हेंबर ते२६ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील प्रत्येक महसुली विभागात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान सर्व महसूली विभागांच्या संवाद यात्रा एकत्रित विधान भवनावर धडक देणार आहेत. त्यानंतरही सरकाराने मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर त्यापुढील आंदोवनाची दिशाही येथूनच ठरविण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर यांनी यावेळी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास आज मी व श्री. @AjitPawarSpeaks साहेब, आ. सौ. विद्याताई चव्हाण, प्रमोद हिंदुराव यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. pic.twitter.com/QGzEkid4VK
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 13, 2018