मुंबई/अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लीटर १० रुपयांचे अनुदान द्यावे, गाईच्या दुधाला ३० रुपये दर द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांनी सोमवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. तर रस्त्यावर दूध ओतून किसान सभेच्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सरकारच्या निषेधाच्या जोरदार दिल्या. मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर पुढील काळात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे.
कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. खासगी संस्था व सहकारी संघांकडून दूध १५ ते १६ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.मराठवाड्यात हिंगोली, लातूर, जालना, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन झाले. हिंगोली -औंढा मुख्य रस्त्यावर येहळेगाव सोळंके शिवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी दूध घेऊन जाणारा ट्रक पेट्रोल टाकून जाळला. लातूर येथे भाजपा महायुतीच्या वतीने जिल्हा प्रशासनास दूध पिशव्या भेट देण्यात आल्या़ जालना जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले.
साताºयात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्हा व शहर भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. भाजप, शिवसंग्राम, रासप, आरपीआय, रयत क्र ांती संघटना व संलग्न पक्षांच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी संघर्ष समिती रस्त्यावर
अहमदनगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्यात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन केले. अकोले येथे सकाळी रस्त्यावर दूध ओतून आंदोलनास सुरुवात झाली. ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, किसान सभेचे राज्यसचिव डॉ. अजित नवले आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातही आंदोलन केले.
दूध उत्पादक शेतकºयांची परवड ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे पाप असून भाजपला दूध उत्पादक शेतकºयांच्या नावावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपने आता स्व:च्या विरोधात आंदोलन करून पापक्षालन करावे. राज्य सरकारने शेतकºयांचे दूध स्वत: खरेदी करून ते भुकटीच्या रूपात साठवण्याचा निर्णय घेऊन अंमलात आणला आहे. - बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री
आज मंत्रालयात बैठक
घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्यामुळे दूध संघाने दूध खरेदी दर कमी केले आहेत.
दुधाला वाजवी दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. या विविध समस्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि दूध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दुधाला ३० रुपये प्रती लिटर भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारपासून आंदोलनास सुरूवात झाली आहे. या आंदोलनास राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळेल.- डॉ. अजित नवले, अकोले
स्वाभिमानीचे आज आंदोलन
कोल्हापूर : स्वाभिमानी संघटनेने मंगळवारी ‘दूध बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे. त्यास ‘गोकुळ’ने मंगळवारी सकाळच्या सत्रातील संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संभाजी ब्रिगेडने याविरोधात विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे तक्रार केली होती.