मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून जनतेचे हाल सुरू आहेत. प्रचंड महागाई, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या विरोधात मुंबईकाँग्रेसने काढलेली पदयात्रा देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. या आंदोलनाने केंद्रातील भाजप सरकारविरोधात ऐतिहासिक युद्ध पुकारले गेल्याचे मत काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी रविवारी व्यक्त केले. वाढती बेरोजगारी, महागाई आणि इंधन दराविरोधात आज मुंबई काँग्रेसने पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान राहिलेल्या राजगृह या वास्तूपासून या पदयात्रेला सुरुवात झाली. तर, चैत्यभूमी येथे याचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेत के. सी. वेणुगोपाल यांच्या समवेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, संजय निरुपम, सूरजसिंह ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, भाजप सरकारच्या काळातील महागाईविरोधात जनतेच्या मनामध्ये किती रोष आहे, हे या पदयात्रेतून समोर आले आहे. पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली आहे. ४०० रुपयांना मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता एक हजार रुपये द्यावे लागतात. देशातील महिलांवर, शेतकऱ्यांवर रोज अत्याचार होत आहेत. हेच का ते अच्छे दिन ज्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले होते, असा प्रश्नही पाटील यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला गेलाय, असे बोलले जात असले तरी त्याला पार्श्वभूमी आहे. महागाई, वाढत्या बेरोजगारीविरोधातील हे शक्तिप्रदर्शन आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात स्मृती इराणी यांचे एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत, असा प्रश्न करत भाई जगताप म्हणाले की, आजची पदयात्रा ही मनमानी मोदी सरकारला दिलेला इशारा असल्याचेही जगताप म्हणाले.