भर उन्हात, कडाक्याच्या थंडीत आशा सेविकांचे आझाद मैदानात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 08:27 PM2024-02-13T20:27:31+5:302024-02-13T20:28:35+5:30
उष्माघाताने सेविका कोसळल्या, तर अनेकांची खाण्यापिण्याची गैरसोय
श्रीकांत जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ आश्वासन नको, ताबडतोब शासन निर्णय जाहीर करा, जीआर चा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही... अशी जोरदार मागणी करत राज्यातील हजारो आशा सेविका आणि बीएफ आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मैदानात भर उन्हात उष्माघाताच्या त्रासाने सहा महिला मंगळवारी आजारी पडल्या आहेत. तर अनेकांची तब्येत बिघडू लागली आहे. मैदानात प्रचंड गैरसोय असतानाही आंदोलन सुरू आहे. आमचा जीव गेल्यावर सरकार शासन निर्णय काढणार आहे का ?, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या आशा सेविकांनी केला आहे.
प्राणांची आहुती देत कोविड काळात आरोग्य कर्मचारी म्हणून सेवा देणाऱ्या आशाला ७ हजार रुपये आणि बीएफला १० हजार रुपये आणि सर्वांना २ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र, अद्याप तसा शासन निर्णय जाहीर झाला नसल्याने गेल्या ५ दिवसांपासून तीव्र ऊन किंवा कडाक्याच्या थंडीची कशाचीही पर्वा न करता जवळपास ३० हजाराहून अधिक आशा व बीएफ आझाद मैदानात न्याय्य हक्कासाठी दिवसरात आंदोलन करत आहेत. यापैकी ६ आंदोलनकर्त्यांची तब्येत बिघडली आहे. तर अनेकांनी भेटेल त्या जागेचा आधार घेत मुंबईत ठिय्या दिला आहे.
कोविड काळात प्राणांची आहुती देत माता आणि मुलांची काळजी घेण्यासाठी रात्री धावाधाव करणे, आरोग्य कर्मचारी म्हणून सेवा देणे असे कार्य आशा वर्कर आणि बी एफ यांनी केले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना सन्मानित केले. सध्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर ही मंडळी काम करीत आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये आशानी बेमुदत संप पुकारलं होता. तेव्हा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशाला ७ हजार रुपये आणि बीएफला १० हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. शिवाय सर्वांना २ हजार रुपये दिवाळी भेट दिली होती. त्याचा महिनाभरात शासन आदेश (जीआर) जारी केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही गेले तरी अद्याप शासन निर्णय निघालेला नाही. त्यामुळे १२ जानेवारी पासून पुन्हा बेमुदत संप सुरू केला आहे. तरीही सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याने ७० हजारांपैकी ३० हजाराहून अधिक आशा व महाराष्ट्रातील बीएफ गेल्या पाच दिवसांपासून ऊन किंवा कडाक्याच्या थंडीची चिंता न करता आझाद मैदानात आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करत आहेत.
- मैदानात गैरसोय ; रेल्वे स्थानकांवर आश्रय !
रविवार रात्रीपासून मोठ्या संख्येने आशा आणि बीएफ कर्मचारी मिळेल त्या वाहनाने आझाद मैदानात येत आहेत. मैदानात दिवसा प्रचंड ऊन आणि रात्री कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शकडो महिला सीएसएमटी रेल्वे आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावर आसरा घेतला आहे. काहींनी मैदानात साड्या आणि चादरीने थंडी उन्हापासून बचाव करण्यासाठी राहुट्या उभारल्या आहेत.
- खाण्यापिण्याची प्रचंड गैरसोय
आझाद मैदान, सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात खाण्यापिण्याची सोय नसल्याने महिलांची धावाधाव सुरू आहे. मिळेल तसे अन्न पदार्थ विकत घेत महिला दिवस काढत आहेत. रात्री तर अधिकच गैरसोय असल्याने काहींना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मैदानात मच्छर,डास आणि घुशी उंदीररांचा त्रास सहन करीत रात्र काढावी लागत आहे.