पालिका परिचारिकांचे उद्यापासून आंदोलन; आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 01:02 PM2022-05-31T13:02:32+5:302022-05-31T13:05:01+5:30
स्थगित केलेले बेमुदत आंदोलन पुन्हा १ जून २०२२पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : विविध मागण्यांसाठी महापालिका परिचारिकांनी ८ मार्चपासून सुरू केलेले आंदोलन स्थगित केले होते. मात्र, प्रशासनाने आश्वासन पूर्ण केले नसल्याने स्थगित केलेले आंदोलन १ जून २०२२पासून सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये पालिकेच्या चार हजार परिचारिकांचा सहभाग राहणार असल्याचे आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी दिली.
देवदास म्हणाले की, न्यायालयाने किमान वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन द्यावी, त्यांना कामगाराचा दर्जा द्यावा, सेवेमध्ये तांत्रिक खंड देऊ नये असे अनेक आदेश दिले असताना त्याची अंमलबजावणी केली जात नाही. प्रशासनाकडून दिलेले आश्वासन पूर्ण केले जात नाही. त्यामुळे स्थगित केलेले बेमुदत आंदोलन पुन्हा १ जून २०२२पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१५पासून किमान वेतन थकबाकीसह द्यावे, २०११पासून भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा लाभ द्यावा, निवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना उपदानाची रक्कम द्यावी, २००० सालापासून दरमहा वाहतूक भत्ता ६०० रुपये द्यावा, प्रसूती रजा द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी ८ मार्चला परिचारिकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते. पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आयुक्तांना सादर झाल्यावर २८ मार्च २०२२ रोजी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन चहल यांनी केले होते.