घरकाम करणाऱ्या हजारो महिला कामगारांचे आझाद मैदानात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:59 PM2024-03-01T22:59:28+5:302024-03-01T23:00:23+5:30
राज्यभरात कोट्यवधी नागरिकाच्या कुटुंबात घर कामगार महिला आपली सेवा देत आहेत
श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घरकाम करणाऱ्या महिलांच्या श्रमाचा योग्य सन्मान, समान वेतनाचा हक्क, आरोग्य विम्याचे अधिकार, मॅटरर्निटी बेनिफिट ग्रॅज्युटी अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या घर कामगार महिलांनी महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी हजारोच्या संख्येने घरेलु महिला कामगार सहभागी झाला होता.
राज्यभरात कोट्यवधी नागरिकाच्या कुटुंबात घर कामगार महिला आपली सेवा देत आहेत. मात्र, वाढत्या महागाईत त्याचे प्रश्न अधिकच प्रखर होत आहेत. अशात शासनाकडून त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले. घरेलु महिला कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राज्य घरेलु कामगार समन्वय समितीचे निमंत्रक ज्ञानेश पाटील यांनी दिला आहे.
प्रमुख मागण्या: मुंबई उच्च न्यायालयाच्या १८ फेब्रुवारी २०२१च्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्डाची स्थापना करा, घरेलू कामगार कल्याण मंडळ आर्थिक दृष्टीने सक्षम व निरंतर व्हावे, या हेतूने शासनाने मंजुरीसाठी मंडळांनी पाठवलेला फेस चार प्रस्ताव विधानसभेत जाहीर करण्यात यावा, एक वेळ नोंदीत साठ वर्षांवरील सर्व घर काम मंडळाला कामगार विमा योजना लागू करण्यात याव्यात.
घर कामगार महिला कामगारांचे प्रश्न खूपच जटिल आहेत. त्यांना शासनाकडून हवे तसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शोषणाच्या त्या बळी ठरतात. शासनाने सहानभूतीने महिला कामगारांचा विचार करून न्याय करावा.
-विद्या रामुगडे, कार्यकर्ता घर कामगार संघटना