लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल महाराष्ट्रात ज्या फायली आणि माहिती उपलब्ध आहे, त्या अद्याप २०२१ मध्ये देखील पाहू दिल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. या फायली ओपन व सर्व माहितीचा उलगडा सर्वांसमोर करणे गरजेचे आहे. मात्र, मला आलेल्या अनुभवावरून कोणा एखाद्या व्यक्तीला त्या बाबतीत कोणतीही माहिती बाहेर येऊ नये, असे वाटत असावे. यामुळेच ही सर्व माहिती उघड व्हावी, यासाठी सावरकरप्रेमींनी आंदोलनच करावे, असे आवाहन इतिहासकार, राजकीय विश्लेषक आणि संरक्षण तज्ज्ञ कपिल कुमार यांनी केले आहे.
सावरकर स्मारकाच्या वतीने बुधवारी आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
‘वीर सावरकर, राष्ट्रवाद आणि विश्व युद्ध’ या विषयावर ते पुढे म्हणाले की, ही माहिती मिळवण्याच्या अनुषंगाने मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मी या पत्रामध्ये माझी सर्व माहिती देऊन देखील राज्याच्या संबंधित पोलीस विभागाकडून मला फोन आला आणि माझी माहिती पुन्हा पाठवण्यास सांगितले. मी त्यांना माझे आधारकार्ड पाठवतो, असे सांगितल्यानंतर त्यांनी विद्यापीठाकडून तुम्हाला सर्टिफाय केलेले पत्र द्यावे, असे सांगितले.
यावेळी तुम्ही एका प्रोफेसरशी बोलत आहात, गुन्हेगाराशी नाही, असे सांगून मी फोन बंद केला. सीआयडीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी असणारी ब्रिटिशकालापासूनची माहिती उघड होऊ नये, असे कोणाला तरी वाटत असावे, असे यावरून लक्षात येते.
अंदमानातील तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सावरकर रत्नागिरीला असताना काय काय करीत होते, यावर ब्रिटिशांची बारीक नजर होती. त्यांच्याबद्दल सीआयडीच्या अहवालात बारीक सारीक गोष्टी नमूद केल्या आहेत. यातील काही नोंदींनुसार ब्रिटिशांचा सावरकरांवर अजिबात विश्वास नव्हता, ते खतरनाक क्रांतिकारक आहेत, असेच ब्रिटिशांचे सावरकरांविषयी मत होते. त्यावेळी क्रांतिकारक कोणत्याही भागातील, भाषिक असो, भारताबाहेर असणाऱ्या क्रांतिकारकांनाही सावरकरांचे १८५७ च्या युद्धावरील पुस्तक प्रोत्साहन देणारे होते. मात्र सावरकरांवर राजकारणी जेव्हा वाट्टेल ते आरोप करतात, तेव्हा अतिशय दु:ख होते.