आंदोलनाचा निखारा अजूनही धुमसताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:36 AM2018-07-28T02:36:17+5:302018-07-28T05:58:13+5:30
मराठवाड्यात हिंसक घटना; पश्चिम महाराष्ट्रात रास्ता रोको; नवी मुंबईतील कोपरखैरणेत तणावपूर्ण शांतता
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यात पेटलेल्या आंदोलनाचा निखारा शुक्रवारीदेखील धगधगत होता. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. पश्चिम महाराष्ट्रात रास्ता रोको, मुंडण आणि जलसमाधी आंदोलन करण्यात आले. नवी मुंंबईतील कोपरखैरणेत झालेल्या आंदोलनात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याने तेथे तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मराठवाड्यात आक्रमक आंदोलन
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे जलसमाधी आंदोलनाला हिंसक वळण लागले़ आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत आठ ते दहा पोलीस कर्मचारी आणि २५ ते ३० आंदोलक जखमी झाले आहेत़ पोलिसांच्या चार वाहनांची तोडफोड झाली. पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले असून शंभरांहून अधिक दुचाकी जप्त केल्या.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या तर सेनगाव येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाळपोळ झाली. दाती फाट्यावर ट्रक जाळून टाकला. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे तरुणांनी गोदावरी नदीच्या पात्रात एक तास जल आंदोलन केले. परळी येथे महिलांनी लाटणे हातात घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. जालना जिल्ह्यात जाफराबादेत जवळपास ५०० युवकांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध केला. अंबड तालुक्यातील वडीगोद्री, शहापूर येथे मुंडण आंदोलन करण्यात आले. घनसावंगी तालुक्यात एकही बस सोडण्यात आली नाही.
परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील विटा खु. येथील गोदावरी नदीपात्रात अर्धजलसमाधी आंदोलन करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात येडशी येथे १२ युवकांनी उस्मानाबाद रस्त्यावरील मोबाईल टॉवरवर चढून घोषणाबाजी करीत आंदोलन केले़
औरंगाबाद जिल्ह्यात आळंद, थेरगाव, फुलंब्री व अंधारी येथेही आंदोलन झाले. आळंद येथे औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती.
कोपरखैरणेत तणावपूर्ण शांतता
मराठा मोर्चाच्या आंदोलनानंतर बुधवारी नवी मुंबईतील कोपरखैरणेत झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या रोहन दिलीप तोडकर (वय १९, मूळ रा. खोणोली ता.पाटण जि.सातारा ) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. दिवसभर अफवा पसरल्याने व्यापाºयांनी स्वत:हून दुकाने बंद केली.परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकाचा मृतदेह मूळ गावी आणताना चाफळमध्ये (जि. सातारा)आंदोलकांनी जाळपोळ करीत रुग्णवाहिका अडविली. दुपारपर्यंत जमाव आक्रमक भूमिकेत होता. त्यानंतर सायंकाळी सखोल चौकशीचे आश्वासन मिळाल्याने तणाव निवळला.
मंत्री देशमुखांच्या घरासमोर आंदोलन
सोलापुरातही आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान बार्शीत गुरुवारी बस जाळल्याप्रकरणी चौघांना न्यायालयाने पोलीस
कोठडी सुनावली.
कोल्हापुरात मुंडण अन् शंखध्वनी
पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन झाले. कोल्हापुरात तिघांनी मुंडण केले. उपस्थितांनी जोरदार शंखध्वनी करून तीव्र संताप व्यक्त केला. दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आ. हसन मुश्रीफ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
सांगली जिल्ह्यात कडेगाव येथे आंदोलकांनी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांना धक्काबुक्की केली.
कडेगावसह तालुक्यातील वांगी, चिंचणी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. वाळवा, शिराळा,मिरज तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलनाची हवा काढण्याचा प्रयत्न
नंदुरबार : राज्य सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा तडीस लावण्यापेक्षा तो चिघळवण्यात अधिक रस घेत आहे़ पदे भरण्याऐवजी आंदोलन चिघळवून पळवाट काढण्याचा तसेच मराठा आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.
आंदोलन राज्यशासनच चिघळवतेय : नीतेश राणे
कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला.