मुंबई : गेली पाच दिवस सुरु असलेले आमरण उपोषण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचा-यांनी मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन स्थगित केले आहे. मात्र, येत्या आठवडाभरात व्यवस्थापनाशी बैठक घेऊन त्यात तोडगा न निघाल्यास मात्र संघर्षाची भूमिका अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई, कार्याध्यक्ष विवेक जुवेकर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव कृती समितीचे सुधीर हेगिष्टे, बाळा मुगदार यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार यांनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात वेळीच सामजंस्याची भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने संघर्ष करून त्यांची समाजात नाचक्की करण्याचा इशारा दिला आहे.
उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, आनंद प्रभू, नाना परब, नितीन मोहिते, भालचंद्र रावराणे, प्रसाद रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असतानाही व्यवस्थापनाने मुद्दाम हा प्रश्न चिघळत ठेवल्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी आहे. 31 डिसेंबरचा थर्टी फर्स्ट संपल्यावर बघू, अशी भूमिका घेतल्यामुळे जखमेवर मीठ चोळल्यासारखी कर्मचा-यांची भावना आहे. किमान वेतन कायद्यानुसार पगार न मिळणे, शारदा थिएटर बंद करून योग्यरित्या न चालविण्याचा निर्णय घेणे, संस्थेचा आर्थिक कारभार चुकीच्या पद्धतीने करून 3 लाख रुपयांचा गैरव्यवहार करणे, मोक्याच्या ठिकाणी जागा असल्यामुळे भविष्याताली त्याच्या विकासाची बाब ध्यानात टेवून व्यावसायिक हितसंबंध ठेवून ग्रंथालयाचा कारभार मुद्दाम ढिसाळ करणे, मनोहर जोशींच्या खासदार निधीतून खरेदी केलेली पुस्तकेदेखील वाचक व अभ्यासकांच्या मागणीनुसार नसणे अशा अनेक बाबींविषयी व्यवस्थापनाच्या कारभारावर यावेळी कर्मचारी वर्गाने गंभीर आरोप केले आहे.
कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व निमंत्रकांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी निमंत्रक होऊन सर्वसमावेशक समिती स्थापन करण्यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. त्याला श्री. हेगडे यांनी होकार दर्शविला असून तिची स्थापना करून येत्या 8-10 दिवसांत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. नरेंद्र वाबळे यांनीदेखील या प्रश्नाला वाचा फोडून व्यवस्थापनाकडून न्याय मिळवून देण्याची भूमिका जाहीर केली. कामगार नेते आण्णासाहेब देसाई यांनी याप्रकरणी कर्मचारी वर्गाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला आहे. कार्याध्यक्ष विवेक जुवेकर यांनी या प्रकरणी संघटनेचा कृती आराखडा जाहीर केला.