Join us

भीमा कोरेगाव घटना: दादरमधील आंदोलन समाप्त, रास्ता, रेल रोको आणि घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 12:48 PM

दादर रेल्वे स्थानक परिसरात आंदोलक आक्रमक झाले असून,  ट्रॅकवर रेल रोकोचा प्रयत्न करण्यात आला.

ठळक मुद्देभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज नायगाव, भोईवाडा, दादर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानक परिसरात घुसण्यास या आंदोलकांना मज्जाव करण्यात आला.

मुंबई -  भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज नायगाव, भोईवाडा, दादर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता आणि रेल रोको आंदोलन केले. नायगावाच्या लोकसेवा संघातून रॅलीला सुरुवात झाली होती. शिवडीमार्गे भोईवाडयात ही रॅली आल्यानंतर मोठया संख्येने आंदोलक सहभागी झाले. हिंदामात परिसरातून जाणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आंदोलकांनी काहीवेळासाठ रास्ता रोको आंदोलन केले. 

आंदोलकांनी सायन आणि परेलच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखून धरली होती. पोलिसांनी या आंदोलकांना तिथून हटवल्यानंतर आंदोलक दादर रेल्वे स्थानकांच्या दिशेने गेले. रेल्वे स्थानक परिसरात घुसण्यास या आंदोलकांना मज्जाव करण्यात आला. पोलिसांबरोबर संघर्ष झाल्यानंतर हे आंदोलक रेल्वे स्थानक परिसरात घुसले. त्यांनी मध्य आणि पश्चिम  दोन्ही मार्गावर रेल रोको आंदोलन केले. जवळपास 17 मिनिटे त्यांचे हे आंदोलन सुरु होते. 

पोलिसांनी आंदोलकांना रुळावरुन हटवल्यानंतर बाहेर येऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली व आंदोलन समाप्त झाले. महिला, लहान मुले  मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :भीमा-कोरेगावमहाराष्ट्र बंद