आग्रा रोडची कोंडी फुटेना; रुग्णवाहिकांना वाट मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:52 AM2024-02-10T10:52:05+5:302024-02-10T10:53:24+5:30
कुर्ला डेपोपासून कमानी सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई :कुर्ला पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पना सिनेमासमोर महापालिकेने हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. कुर्ला डेपोपासून कमानी सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. या कोंडीमुळे पादचारी या मार्गावर चालत जाणे पसंत करत असून, रुग्णवाहिकेला तर कमानी ते कुर्ला डेपो हे अंतर पार करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागत आहे.
मुंबई, ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पना सिनेमा ते कुर्ला डेपो सिग्लनदरम्यान महापालिकेच्या रस्ते विभागाने रस्त्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू झाले असून, ठाणे आणि सायन दिशेकडील रस्त्याच्या अर्ध्या बाजूवर काम सुरू आहे,
एलबीएसवर सुरू असलेल्या कामामुळे टॅक्सी आणि रिक्षाचालक या मार्गावरील भाडे घेण्यास नकार देतात.
कमानी आणि कुर्ला डेपो सिग्नल येथे वाहतुकी पोलिसांच्या चौक्या आहेत. वाहतूक पोलीस तैनात असूनही कोंडीत घट होत नाही.
कमानीपासून कुर्ला डेपोपर्यंत शीतल सिग्नल, बैलबाजार नाका सिग्नल आणि कालिना नाका सिग्नल असे तीन सिग्नल आहेत.
कुर्ला डेपोपासून कमानी सिग्नलपर्यंतचा फुटपाथ कधीच रिकामा नसतो. शिवाय फुटपाथलगत कायमच अवजड वाहने उभी केलेली असतात.
ठाणे दिशेकडून अंधेरीकडे जाणाऱ्या वाहनांना बैल बाजार नाक्यावर मोठे वळण घ्यावे लागते. मोठ्या वाहनांच्या वळणादरम्यान रोड ब्लॉक होतो. अर्धी बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
काय आहेत अडचणी?
फुटपाथ रिकामे हवेत. मात्र फुटपाथवरही दुचाकी उभ्या केल्या जातात.
फुटपाथवर हॉटेल्सचालकांचे ठेले लागलेले असतात.
कधी कधी फुटपाथवर कार उभ्या असतात.
कल्पना सिनेमाच्या विरुद्ध बाजूकडील फुटपाथ बैल बाजार नाक्यापर्यंत अस्वच्छ आहे.
लगत पार्क करण्यात आलेल्या वाहनांची भलीमोठी रांग असते.