आगरी - कोळी समाजालाही हवे वेगळे आरक्षण
By Admin | Published: January 12, 2015 02:05 AM2015-01-12T02:05:11+5:302015-01-12T02:05:11+5:30
इतर समाजांना आरक्षण मिळत असताना आगरी-कोळी समाजाला देखील वेगळे आरक्षण मिळण्याची गरज आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे
नवी मुंबई : इतर समाजांना आरक्षण मिळत असताना आगरी-कोळी समाजाला देखील वेगळे आरक्षण मिळण्याची गरज आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी वर्गामध्ये अनेक जाती असल्याने आगरी-कोळी समाजाला आरक्षणाचा पुरेसा फायदा होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार आगरी - कोळी समाजाला स्वतंत्र आरक्षणासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नेरूळ येथे सांगितले.
अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरूळ येथे आगरी - कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शनिवारी आगरी - कोळी भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार सुभाष भोईर उपस्थित होते. यावेळी आगरी - कोळी समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची गरज त्यांनी व्यक्त केली. आगरी - कोळी समाज वर्ग होत असलेल्या ओबीसीमध्ये सुमारे १२३ समाज आहेत. त्यामुळे आगरी - कोळी समाजाला पुरेसा लाभ होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. इतर समाजासाठी सध्या आरक्षण मिळत आहे. त्यास आपला विरोध नसून त्यांच्याप्रमाणेच आगरी-कोळी समाजाला देखील वेगळे आरक्षण मिळावे याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले. तर समाज प्रत्येक क्षेत्रात पुढे येत असताना पैशांचा दुरुपयोग टाळावा असा सल्लाही त्यांनी आगरी - कोळी समाजाच्या तरुणांना दिला. ग्रामसंस्कृती जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना आगरी - कोळी भूषण पुरस्काराने गौरवले जात असल्याचे आयोजक नामदेव भगत यांनी सांगितले. याप्रसंगी प्रसिध्द गायक चंद्रकांत शिंदे यांच्या गाण्यांच्या व आगरी- कोळी नृत्याच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. कार्यक्रमास नगरसेविका इंदुमती भगत, मोरेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)