कृषी विद्यापीठांनी मराठी भाषेत पुस्तके उपलब्ध करावी; उच्च शिक्षण संचालकांचे आदेश
By स्नेहा मोरे | Published: September 6, 2023 06:40 PM2023-09-06T18:40:30+5:302023-09-06T18:40:38+5:30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषेतून शिक्षण देणे हे धोरण नमूद केलेले आहे. सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरू झालेले आहे. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांना मराठी भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध नाहीत.
मुंबई - राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी त्यांची क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांना मराठी भाषेत ३१ सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. ही पुस्तके मराठीत भाषांतरित करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे, याबाबतचा अहवाल विद्यापीठांना सादर करावा लागणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग व आयआयटी मुंबई यांच्या दरम्यान उडान प्रकल्पांतर्गत इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तकांचे मराठी भाषेत भाषांतर करण्याबाबतचा करार ५ जानेवारी रोजी करण्यात आलेला आहे. या करारानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेतील सर्व इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तके आयआयटी मुंबई यांचेकडून भाषांतरीत करून घेण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यातील एकाही विद्यापीठाने इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करण्याची कार्यवाही आपल्या करण्यात आलेली नाही.
दोन आठवड्यांत पुस्तके द्या
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषेतून शिक्षण देणे हे धोरण नमूद केलेले आहे. सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरू झालेले आहे. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांना मराठी भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात विज्ञान व वाणिज्य विषयाची प्रत्येकी १० क्रमिक पुस्तके आयआयटी मुंबई यांच्या मदतीने विद्यापीठाने भाषांतर करून घेण्याचे आदेश डॉ. देवळाणकर यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित सर्व पुस्तके सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत भाषांतर करुन घेण्याची कार्यवाही करायची आहे, असेही डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले आहे.