शेती कायद्याला एपीएमसीचे आव्हान देणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:09 AM2020-10-02T02:09:38+5:302020-10-02T02:09:59+5:30
डॉ. गणेश देवी; कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप; एपीएमसीचा घेतला आढावा
नवी मुंबई : केंद्र सरकारने कोरोना काळात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेती व शेतकऱ्यांच्या बैठकीत तीन महत्त्वाचे अध्यादेश काढले आहेत. या अध्यादेशामुळे बाजार समित्यांवर झालेल्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी शिष्टमंडळासह राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये संवादयात्रा सुरू केली आहे.
बुधवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटचा आढावा घेतला. त्यावेळी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारचा हा शेतकरी धोरण कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करीत या कायद्याला एपीएमसीने आव्हान करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या बैठकीला आमदार कपिल पाटील, आमदार शशिकांत शिंदे, एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, चंद्रकांत पाटील, सुरेखा देवी, अतुल देशमुख, विविध मार्केटचे व्यापारी, माथाडी संघटनेचे प्रतिनिधी, शिक्षक भारतीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
‘देश गुलामीत ढकलण्याची वाटचाल’
केंद्र सरकारच्या अशा अध्यादेशांमुळे देश गुलामीत ढकलण्याची वाटचाल सुरू आहे. संपूर्ण प्रकिया उलटवून टाकण्याची गरज आहे. शेतकरी ते एपीएमसी अशी फळी उभी करून शेतकऱ्यांची संपूर्ण जबाबदारी एपीएमसीने घेतली पाहिजे, असा सल्ला डॉ. गणेश देवी यांनी यावेळी दिला.