नंदकुमार टेणी, ठाणेडॉ. जयंतराव पाटील यांच्या निधनामुळे भारतीय कृषी क्षेत्रातील कर्ता, संशोधक हरपला आहे. बोर्डी येथे त्यांचा जन्म झाला. आचार्य भिसे यांचा सहवास आणि शिक्षक म्हणून मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यामुळे त्यांनी आपले सगळे कर्तृत्व आणि जीवन याच परिसराला वाहून दिले. संपूर्ण जगाने त्यांच्या संशोधन आणि कर्तृत्वाचा गौरव केला तरी त्यांनी आपली बोर्डी आणि कोसबाड कधीही सोडले नाही. पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी आणि एम एस्सी केले. अमेरिकेतून त्यांनी एमएस केले तरी ते बोर्डीतच रमले. पाणीटंचाईवर मात करून भूजल समृद्धी साधण्यासाठी आणि शेतीचा कस वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयोगातून कोसबाड विहिर साकारली होती. अवघ्या १२०० रुपयांत ही विहिर कोणत्याही साहित्याच्या वापराविना साकारत असे. वरचा व्यास १८ मीटरचा आणि खोली ५ मिटरची असा खड्डा खणून त्यात पावसाचे पाणी साठवायचे. ते शेतीसाठी वापरायचे आणि त्यात जो पालापाचोळा पडायचा तो कुजून तळाशी साठायचा. विहिर आटली की, तो बाहेर काढून जमिनीत खत म्हणून टाकायचा. असा त्यांचा हा प्रयोग खूप गाजला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने अशा असंख्य विहिरी बांधल्यात. ताज्या हिरव्यागार आणि पोषक अशा हिरव्या पाल्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत मिळावे यासाठी त्यांनी शेतीच्या बांधावर ग्लायरेसिडीया या वनस्पतीची लागवड करण्याचा प्रयोग केला. कोणत्याही सिंचनाविना झपाट्याने वाढणारी आणि खत म्हणून पोषक पाला भरपूर देणारी अशी ही वनस्पती होती. तिच्या बिया आणि रोपे पाटील हे शेतकऱ्यांना मोफत देत असत. ठाणे जिल्ह्यात गव्हाची लागवड होऊ शकते हे त्यांनी सर्वप्रथम दाखवून दिले. ठाण्यामध्ये कापसाचे पीकही त्यांनी घेऊन दाखविले होते. ठाणे जिल्ह्यातल्या पाणी आणि सिंचन टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी भूजलाचा शोध घेऊन विदेशी अर्थसहाय्याने आदिवासी विभागात दिडशे विहिरी सार्वजनिक स्वरुपात बांधल्या होत्या. तांदुळ , गहू आणि मूग असा वर्षभर घेता येणारा शेतीचा तिहेरी पॅटर्न त्यांनी घडविला होता. गुजरात, कुलाबा आणि ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पारंपारिक घासाचे उत्पादन घेतले जायचे. परंतु त्याची पोषकता अत्यंत कमी आहे हे सिद्ध करून त्यांनी तेथे पौष्टिक अशा घासाची लागवड करायला लागून दुग्धोत्पदनामध्ये वाढ घडविली आणि पशुधनाचीही समृद्धी साधली. फलोद्यानातून समृद्धता साधता येते हे त्यांनीच आशिया खंडाला दाखवून दिले. पुढे त्यांचेच हे मॉडेल आधी महाराष्ट्र शासनाने आणि नंतर केंद्रशासनाने फलोद्यान धोरण म्हणून स्वीकारले. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासींमध्ये असलेले साक्षरतेचे ६ टक्क्याचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांनी आश्रमशाळा सुरू केल्या. या कार्यात त्यांच्या पत्नी सौ.मीना पाटील यांनीही साथ दिली. त्या स्वत: एम.ए. सायकॉलॉजी आणि बी.एड झाल्या होत्या. इंडियन कौन्सील आॅफ अॅग्रीकल्चरल रिसर्च च्या नेतृत्वाखाली त्यांनी कोसबाड येथे कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली होती. त्यांना जमनालाल बजाज पुरस्कारही प्राप्त झाला होता. कृषी भूषणचेही ते मानकरी होते. म्हणूनच त्यांच्या निधनाने कर्ता संशोधक हरपला आहे, असे म्हणावेसे वाटते.
कृषी क्षेत्रातील कर्ता, संशोधक हरपला
By admin | Published: April 07, 2015 10:49 PM