Join us

कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. तपस भट्टाचार्य नियुक्त--‘लोकमत’चा पाठपुरावा

By admin | Published: November 04, 2015 10:26 PM

प्रतिक्षा संपुष्टात : नव्या निकषानुसार निवड

दापोली : तब्बल ११ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. तपस भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा ही निवड जाहीर करण्यात आली.देशातील पहिल्या क्रमांकाचे कृषी विद्यापीठ असलेल्या दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळण्याची प्रतीक्षा होती. या निवडीने ती पूर्णत्वास गेली आहे. तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे डिसेंबर २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. डॉ. लवांडे निवृत्त होण्याअगोदर तीन महिन्यांपासून निवड प्रक्रिया सुरू झाली. मात्र निवड समितीला कुलगुरु पदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्याने डिसेंबर २०१४ मध्ये घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे कृषी विद्यापीठाचा कार्यभार परभणीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. गेले ११ महिने हा कार्यभार त्यांच्याकडे आहे.पहिल्यांदा निवड प्रक्रिया रद्द झाल्यानंतर राज्यातील कृषी विद्यापीठात ५ वर्षे संचालकपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकही पात्र उमेदवार नसल्याने कुलगुरुपदाच्या पात्रतेचे निकष बदलण्याची मागणी होऊ लागली. राज्यातील कृषी विद्यापीठाचा विचार करून चारही विद्यापीठांकडून याबाबतच्या हरकती मागवण्यात आल्या. त्यानंतर राज्यपालांनी हे निकष बदलण्यास मंजुरी दिली. त्यातील निवडक पाच उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी झाल्या. तेव्हापासून कुलगुरूंच्या नावाची प्रतीक्षा वाढली होती. अखेर बुधवारी सायंकाळी डॉ. तपस भट्टाचार्य यांचे नाव जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)डॉ. तपस हे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोग नियोजन ब्युरो नागपूरचे संचालक आहेत. नोव्हेंबर १९५६ मध्ये नवी दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला. कृषी विषयामध्ये पदवी धारण केल्यानंतर त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्लीमध्ये पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर मृदा शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ‘नॅशनल ब्युरो आॅफ सॉईल सर्व्हे अ‍ॅण्ड लॅण्ड युज प्लॅनिंग’मध्येही काम केले. आता ते तेथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मातीशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकल्प सादर केले आहेत. त्यांनी जवळपास १०० शोधनिबंध आणि त्या विषयावरील पुस्तके लिहिली आहेत. ‘लोकमत’चा पाठपुरावाकुलगुरू निवडीसाठी पाच वर्षे संचालक म्हणून काम केलेल्या व्यक्तीचाच विचार केला जाईल, या निकषामुळे या पदासाठी कोणीही पात्र ठरत नव्हते. त्यावेळी सर्वाधिक पाठपुरावा ‘लोकमत’ने केला आणि हे निकष बदलण्याची गरज प्राधान्याने मांडली. त्यामुळे राज्यपालांकडून त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आणि निकषात बदल करण्यात आले. निकषांमधील बदलामुळेच आता कुलगुरू निवड झाली आहे.