मुंबई - चुलीवरचे जेवण, सोसाट्याचा वारा अन् हिरव्यागार निसर्गाची कुस अशा रम्य वातावरणाचा अनुभव घेण्याचा कल पर्यटकांमध्ये वाढतो आहे. पर्यटकांच्या या आवडीचा कल घेऊन आता राज्यातील कृषी पर्यटन व्यावसायिकांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती पर्यटन विभागाने दिली आहे. त्याखालोखाल तरुण पिढीतील पर्यटकांमध्ये ' कुछ तुफानी करते है..' म्हणत वाढणारे साहसी पर्यटनही वाढत असून हे व्यावसायिकही आता वाढत आहेत.
राज्यात मेट्रो शहरांतील वाहनांच्या धुरात व सिमेंटच्या जंगलात वावरणाऱ्या आणि रोज त्याच त्याच कामात व्यस्त असणाऱ्या लोकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून खास वेळ काढून मजा लुटण्यासाठी व मन:शांतीसाठी शहरापासून दूरवर पर्यटन अनुभवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे आणि शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी सुनियोजीत व्यवस्था निर्माण करुन पर्यटन विकास साध्य करण्यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे.
कृषी पर्यटनामागे ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधण्याचा उद्देश आहे. त्याचसोबत शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे, ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, शहरी भागातील लोकांना शेती आणि शेती पध्दती तसेच कृषी संलग्न व्यवसायांची माहिती उपलब्ध करुन देणे, ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे आणि पर्यटकांना प्रदुषणमुक्त, शांत व निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे.
तीन वर्षांतील आकडेवारी
व्यावसायिक नोंद
कृषी पर्यटन ६५०
साहसी पर्यटन ५१२
कॅराव्हॅन पर्यटन ०८
रोजगार निर्मितीचे लक्ष्य
पर्यटन क्षेत्रामध्ये वार्षिक दहा टक्के उत्पन्न आणि राज्याच्या सकल उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा १५ टक्के वाटा प्राप्त करणे. तसेच या क्षेत्रात २०२५ पर्यंत एक दशलक्ष रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी या धोरणांतर्गत ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन राबविण्याची संकल्पना समाविष्ट करण्यात आली आहे.
-रविंद्र पवार, सहाय्यक संचालक, पर्यटन संचालनालय