मुंबई - अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली आहे. कालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आता उत्तर देतील का?, तावातावाणे बोलणारे आता गप्प का आहेत?, असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला धारेवर धरले. शिवाय, या घोटाळ्यातील आरोपांप्रकरणी गांधी कुटुंबीयांनी स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. प्रत्येक घोटाळ्यात एकाच कुटुंबाचं नाव कसं?, असा प्रश्नही यावेळेस त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी (31 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारात संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव घेण्यात आले आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील कथित दलाल ख्रिश्चयन मायकेल यानं जबाब देताना श्रीमती गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. त्याच्या बोलण्यात 'भारताचा पंतप्रधान होणारा इटालियन महिलेचा मुलगा' असाही उल्लेख आला. मात्र, दोन्ही उल्लेखांच्या अनुषंगाने त्याच्याकडून अधिक माहिती घेणे शक्य झाले नाही, असा दावा ईडीनं शनिवारी कोर्टात केला. याचाच संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, ''इटली कोर्टाच्या निकालपत्रात सोनिया गांधींचे चार वेळा नाव आले आहे. ख्रिश्चियन मिशेल हा ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्त्वाचा माणूस आहे. या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाला आहे. ईडीने हीच गोष्ट कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे अगुस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणी करण्यात आरोपांवर गांधी कुटुंबीयांनी स्पष्टीकरण द्यावे''.
'श्रीमती गांधीं'च्या नावाचा उल्लेख
ईडीचे विशेष वकील डी.पी.सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिश्चयन मायकेलच्या बोलण्यात 'श्रीमती गांधीं'च्या नावाचा उल्लेख आला. आम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे होते, पण त्यावेळी त्याचे वकील तेथे हजर होते. मायकेलनं कागदावर काही तरी लिहिलेली चिठ्ठी, बहुधा काय उत्तरे द्यावी, हे सांगण्याच्या अपेक्षेनं वकिलाकडे दिली. मात्र 'श्रीमती गांधीं' हा उल्लेख कोणत्या संदर्भात आला, हे लगेच उघड करता येणार नाही.
टिपण बनावट असल्याचा दावावकील सिंग पुढे असंही म्हणाले की, कराराच्या वाटाघाटींच्या संदर्भातील कागदपत्रांत जो पंतप्रधान होणार आहे तो इटालियन महिलेचा मुलगा, असा उल्लेख आहे. मायकेलन इतरांशी केलेल्या पत्रव्यवहारात एका व्यक्तीचा 'आर' या इंग्रजी अक्षरानं उल्लेख केला. आर म्हणजे कोण, याचीही माहिती घ्यायची आहे. या प्रकरणाचा इटलीत तपास केला, तेव्हा काही अधिकाऱ्यांना 'नॉर्थ ब्लॉक'जवळ पैसे दिले गेल्याचा उल्लेख त्यांना टिपणात आढळला होता. ज्यांना पैसै दिले त्यांचा उल्लेख सांकेतिक असल्याचा तेथील अधिकाऱ्यांनी म्हटले होते. मात्र ते टिपण बनावट असल्याचा दावा मायकेलनं केला आहे.
काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा?भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून ‘एडब्ल्यू 101’ प्रकारातील 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार 2010 साली केला. हा करार 3,546 कोटी रुपयांचा होता. त्यातील 8 हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर 4 अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.
पूर्वीची रशियन एमआय-8 ही होलिकॉप्टर आता कालबाह्य ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 1999 साली प्रथम ही मागणी झाली. 2005 साली त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या. या पहिल्या निविदांमध्ये 6000 मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती. उंचीची (सव्र्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने 2006 साली शिथिल करून 4500 मीटरवर आणली. त्यामुळे या स्पर्धेतील अमेरिकेच्या सिकोस्र्की कंपनीच्या ‘एस-92 सुपरहॉक’ हेलिकॉप्टरची संधी हुकली असे म्हटले जाते. निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे.
या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. फिनमेकॅनिका आणि ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने भारताकडून हे कंत्राट मिळवण्यासाठी इटली व भारतात अनेकांना सुमारे 423 कोटी रुपयांची लाच दिल्याचा संशय व्यक्त करून इटलीच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाने चौकशी सुरू केली. सीबीआयने मार्च 2013 मध्ये 18 संशयितांविरोधात एफआयआर दाखल केली. सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत तपास सुरू केला.
भारताने 1 जानेवारी 2014 रोजी हा करार रद्द केला. तोपर्यंत करारातील 3 हेलिकॉप्टर भारताला मिळाली होती. करार रद्द होईपर्यंत भारताने कंपनीला 1620 कोटी रुपये दिले होते आणि जानेवारी 2014 मध्ये भारतीय बँकांमध्ये हमी म्हणून ठेवलेले 250 कोटी रुपये परत घेतले होते. इटलीच्या 'फिनमेक्कनिका' कंपनीने 12 ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या सौद्यापोटी माजी वायुसेना प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईंकाना लाच दिल्याचा आरोप आहे.