Join us

Maharashtra CM: पकडा याला, पकडा याला... धनंजय मुंडे दिसताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 9:40 PM

धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटत होत्या.

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेबाबत सगळ्यात मोठी घडामोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अजित पवारांच्या बंडाला धनंजय मुंडे यांची साथ असल्याचं चित्र होतं. धनंजय मुंडे यांचा कॉलही नॉट रिचेबल लागत असल्याने धनंजय मुंडे हेदेखील अजितदादांसोबत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यातच धनजंय मुंडे अचानक  यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झाल्याने सर्वांना धक्काच बसला. त्यानंतर काही कार्यकत्यांकडून राग अनावर झाल्याने पकडा याला अश्या घोषणा देण्यात येत होत्या.

अजित पवारांसोबत सकाळी राजभवनावर गेलेल्या काही आमदारांपैकी अनेकांनी आपल्याला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन आल्याचे सांगितले. तर काहींनी आपल्याला धनंजय मुंडे यांनी फोन केल्याचे सांगितल्याने धनंजय मुंडेंच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर सायंकाळी आज बैठकीच्या ठिकाणी अचानक धनंजय मुंडे दाखल झाल्याने बाहेर जमलेल्या प्रचंड गर्दीने पकडा याला पकडा याला अशा घोषणा देण्यात आल्या.

अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली. मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. यातील आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानासाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले आहेत. 

अजित पवारांनी या आमदारांना फोन करुन बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील बहुतांश आमदारांना अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. विधिमंडळ नेत्याचे आदेश आल्याने हे सर्व आमदार अजित पवारांसोबत राजभवनात गेले होते. त्यामुळे अजित पवारांनी आमदारांना फोडण्याची रणनीती बनविल्याची चर्चा आहे. सध्या भाजपाचे संख्याबळ १०५ आमदार आहेत तर अपक्ष आमदारांचा पाठिंबा पकडून भाजपाचं संख्याबळ ११९ वर पोहचलं आहे. मात्र बहुमत गाठण्यासाठी भाजपाला आणखी २२ आमदारांची गरज आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची नेमकी संख्या किती याबाबत स्पष्टता नाही. मात्र जे सदस्य त्यांच्यासोबत गेले होते त्यातील ७ आमदार पुन्हा शरद पवारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. 

टॅग्स :धनंजय मुंडेअजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपादेवेंद्र फडणवीस