१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर; शिक्षकांची दांडी, ‘परीक्षा पे चर्चा’ नोंदणीच्या सक्तीमुळे बेजार
By रेश्मा शिवडेकर | Published: January 7, 2024 07:05 AM2024-01-07T07:05:08+5:302024-01-07T07:06:30+5:30
एकदम इतकी अशैक्षणिक कामे आल्याने शिक्षकांना वर्गाला दांडी मारावी लागते आहे.
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘निपुण भारत’चे प्रशिक्षण, ‘साक्षरता अभियाना’पाठोपाठ आता पंतप्रधानांसमवेतच्या ‘परीक्षा पे चर्चा’साठी किमान ५० टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याच्या सक्तीमुळे राज्यभरातील शिक्षक बेजार झाले आहेत. दहावीच्या मुलांचा सराव, पूर्वपरीक्षा, इतर मुलांच्या घटक चाचण्या अशी शैक्षणिक कामे तोंडावर असतानाच एकदम इतकी अशैक्षणिक कामे आल्याने शिक्षकांना वर्गाला दांडी मारावी लागते आहे.
'परीक्षा पे चर्चा'साठी १९ डिसेंबरला काढलेल्या पत्रानुसार, जास्तीत जास्त विद्यार्थी-पालकांना सहभागी करून घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. हे काम अर्थातच शिक्षकांच्या माथी मारले आहे. पुरेशी नोंद न झाल्याने आता प्रत्येक शाळेने किमान ५० टक्के विद्यार्थ्यांना व पालकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना तोंडी दिल्याची माहिती एका मुख्याध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
ही माहिती शाळांना शिक्षण संचालनालयांना सादर करायची आहे, तर शिक्षणाधिकाऱ्यांना या सगळ्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. या सक्तीच्या प्रकाराबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
वेळखाऊ काम
नोंदणीसाठी ‘इनोव्हेट इंडिया’ या संकेतस्थळावर स्वत:बरोबरच प्रत्येक विद्यार्थी, पालकाची नोंद शिक्षकांना करायची आहे. यात मोबाइल नंबर, नाव-गाव, जन्मतारीख, इयत्ता, लिंग या वैयक्तिक माहितीबरोबरच शाळेची माहिती, काही प्रश्नांची उत्तरे, पंतप्रधानांना प्रश्न, असे अनेक कॉलम भरावे लागतात. त्यात शिक्षकांचा बराच वेळ खर्च होत असल्याची तक्रार पश्चिम उपनगरातील एका शाळा शिक्षकांनी केली.
मुलांच्या अभ्यासावर होतोय परिणाम
दहावीच्या मुलांच्या सराव परीक्षा तोंडावर आहेत. त्याआधी शिकवून झालेल्या अभ्यासक्रमाचा सराव, परीक्षेच्या तयारीचे काम आहे. शाळेतील इतर मुलांच्या घटक चाचण्या, त्यांचा अभ्यासाचा सराव हेही तोंडावर आहे. त्यात या कामामुळे शिक्षकच वर्गावर गैरहजरच राहिले तर त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होण्याची भीती आहे.
काय आहे ‘परीक्षा पे चर्चा’?
हा कार्यक्रम पंतप्रधानांसमवेत दिल्लीत होणार असून, यात जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांना, शिक्षकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना, उपसंचालकांना व्यक्तिश: लक्ष घालण्यास सांगितले आहे. १९ डिसेंबरला सुरू झालेले हे काम शिक्षकांना १२ जानेवारीपर्यंत संपवायचे आहे. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम होणार आहे.
एकाच वेळी अनेक कामे
- राज्यातील सर्व शिक्षकांना २ ते ६ जानेवारीदरम्यान ‘निपुण भारत’अंतर्गत दोन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत कार्यशाळेला हजेरी लावावी लागली होती. त्यामुळे हे दोन दिवस शिक्षक शाळेवर नव्हते.
- त्यात साक्षरता अभियानांतर्गत दिवसभर चालणाऱ्या प्रशिक्षणाला हजेरी लावणे शिक्षकांना बंधनकारक केले आहे.