Join us  

Raj Thackeray: मोठ्या पूजेची सांगता, आपण उत्तरपूजेने करतो; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 2:00 PM

ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. 

मुंबई- गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या सभेनंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चौफेर हल्ला चढवला. मशिदीवरील भोंगे सरकारने हटवावे अन्यथा आम्ही भोंग्यासमोर दुपटीने लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरेंनी म्हटलं होते.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरुन महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीका केली. तसेच पक्षातील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. तर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचं म्हटलं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे आरोप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरेंची गुढीपाढव्याची जी सभा झाली. त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना मिरच्या झोंबलेल्या देखील बघायला मिळाल्या. त्यामुळे ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. 

राज ठाकरेंची ही सभा कशासाठी ठेवण्यात आली आहे, असा काही जणांना प्रश्न पडला असेल. मात्र एखादी मोठी पूजा होते, त्याची सांगता आपण उत्तरपूजेने करतो, असं संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी सांगितले. एखाद्याची आपल्याला उत्तरक्रिया देखील करावी लागते आणि काही लोकांना उत्तरं देखील द्यावी लागतात, असं संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितलं. 

ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या समोरील रोडवर ही सभा होणार असून यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सभेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. शिवतीर्थावरील भाषणात राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व दाखवत मशीद, भोंगे आणि मदरशांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट जातीयवादाचे आरोप केले होते.

जितेंद्र आव्हाडांना देणार उत्तर?

राज ठाकरेंच्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी सातत्याने टीका सुरूच ठेवली आहे. आव्हाड म्हणाले की, मुंब्र्यातील मदरशांमध्ये वस्तारा जरी सापडला, तरी आपण राजकारण सोडून देऊ, पण राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्र पेटवू नका, लाव रे तो व्हिडिओ पासून आता लाव रे हा व्हिडिओ असा राज ठाकरेंचा प्रवास झाल्याचं आव्हाडांनी म्हटलं. तसेच आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे असं सांगून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही. लाखांच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं. पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आला तुम्ही. त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं आवाहनही आव्हाडांनी केलं होते.

टॅग्स :राज ठाकरेअविनाश जाधवसंदीप देशपांडेमनसे