Raj Thackeray: 'गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार'; राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 11:14 AM2022-05-21T11:14:06+5:302022-05-21T11:24:07+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरद्वारे इशारा दिला आहे.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली असून, पुण्यातील सभेत यावर सविस्तर भाष्य करणार असल्याचेही म्हटले आहे.
अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. पहिल्यांदा २१ मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचं नदीपात्रात आयोजन करण्यात आलं. पण पावसाची शक्यता लक्षात घेता सभेचं नियोजन बदलून आता ती सभा रविवारी २२ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच इथे सकाळी १० वाजता होणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार, तर बेगडी धर्मनिरपेक्षता वाल्यांचे बुरखे फाटणार... ज्वलंत आणि जाज्वल्य हिंदुत्वाची गर्जना होणार.., असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे नेमकं कोणावर निशाणा साधणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गदाधारी,भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार,तर बेगडी धर्मनिरपेक्षता वाल्यांचे बुरखे फाटणार ... ज्वलंत आणि जाज्वल्य हिंदुत्वाची गर्जना होणार…
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 21, 2022
चला पुणे,
रविवार दिनांक 22 मे 2022 रोजी, स्थळ-गणेश कला क्रिडामंच,स्वारगेट ... pic.twitter.com/H8m24cNOMn
दरम्यान, मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं. शिवाजीनगरचे मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क झटापटीत झालं असल्याचं समोर आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात आयोजित बैठकीत निमंत्रण न दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांत वाद झाला. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चक्क झटापटही झाली.
‘चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!’
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा स्थगित केल्यानंतर सुरू झालेल्या तर्कवितर्कांना मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ‘तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल, असा आहे. जो नेता महाराष्ट्र हितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने निर्णय बदलेल का? विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.