अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन नागपूरपर्यंत नेणार! मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर अशी बुलेट ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 02:39 AM2017-08-26T02:39:13+5:302017-08-26T05:59:19+5:30
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तार करून ती नागपूरपर्यंत नेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी विशेष आग्रही आहेत.
मुंबई : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तार करून ती नागपूरपर्यंत नेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी विशेष आग्रही आहेत.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या मुख्य उपस्थितीत सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात अहमदाबाद येथे होणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्याचे काम सुरू असून तो आॅक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. स्पेनची एक कंपनी हा अहवाल तयार करीत असून हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरू शकतो, अशा निष्कर्षाप्रत ही कंपनी आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. अहमदाबाद-मुंबईसह देशभरातील बुलेट ट्रेन प्रकल्पांची उभारणी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड करीत आहे. अहमदाबाद-मुंबई प्रकल्पाच्या उभारणीसाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कॉर्पोरेशनला या प्रकल्पासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सुमारे एक हेक्टर जागा राज्य शासनाने देऊ केली आहे. ही जागा ४७ हेक्टरमध्ये उभारण्यात यावयाच्या आंतररराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांतर्गतची आहे. या केंद्राची इमारत कॉर्पोरेशनने उभारून द्यावी आणि मुंबई-नागपूर असा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तार करावा, अशा अटी राज्य शासनाने टाकल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला समांतर अशी बुलेट ट्रेन या दोन शहरांदरम्यान असावी म्हणजे राज्याच्या आर्थिक विकासाला प्रचंड वेग येईल असा राज्य शासनाचा मुख्य हेतू आहे. बुलेट ट्रेनचा मुंबई-नाशिक-औरंगाबाद-अकोला-अमरावती-नागपूर हा मार्ग असेल. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रॉजेक्ट’ असून त्याला बुलेट ट्रेनची जोड मिळेल.
मुंबईहून अहमदाबादला रेल्वेगाडीने जाण्यास सध्या (६५० किमी) सुमारे सात तास लागतात. बुलेट ट्रेनमुळे दोन तासाहून कमी वेळात अहमदाबाद गाठता येईल. तसेच नागपूर-मुंबई हे ८३६ किमीचे अंतत दोन-अडीच तासात पार करता येणार आहे.