राज्यातील एकमेव शिक्षकाला सन्मान, नारायण यांना राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:10 AM2020-08-23T11:10:56+5:302020-08-23T14:16:22+5:30
केंद्र सरकारने राज्य सरकारकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी नावांची यादी मागवली होती. त्यामध्ये, देशातील 36 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातून 153 शिक्षकांची निवड झाली होती.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने 2020 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील एकमेव शिक्षकाला हा सन्मान मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक नारायण मंगलारम यांना हा बहुमान देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यांच्या शिफारसीनुसार 153 शिक्षकांची निवड केली होती. त्यापैकी, 47 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील एकमेव शिक्षकाचा समावेश आहे. देशात लॉकडाऊन असल्याने ही निवड पद्धती व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आली.
केंद्र सरकारने राज्य सरकारकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी नावांची यादी मागवली होती. त्यामध्ये, देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 153 शिक्षकांची निवड झाली होती. या 153 शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने आपला प्रेझेंटेनश केंद्रीय निवड समितीसमोर सादर करायचे होते. त्यानुसार, गेल्या आठवड्यात या 153 शिक्षकांनी केंद्रीय समितीसमोर आपले प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर, 21 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील नारायण मंगलारम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्याच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातून केंद्रीय समितीकडे 6 नावांची यादी पाठविण्यात आली होती. या 6 शिक्षकांनी केंद्रीय निवड समितीसमोर आपले सादरीकरण केले. त्यामध्ये, गोपाळवाडीतील जिल्हा परिषद शिक्षक नारायण मंगलाराम यांची निवड झाली आहे. राज्य निवड समितीकडून निवड झालेल्या 5 जणांमध्ये वाशिम, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद या 6 जिल्ह्यातील शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
शिक्षक दिनी केला जातो शिक्षकांचा सन्मान
देशात दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवन दिल्ली येथे हा सोहळा संपन्न होत असतो.