लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अल्टामाऊंट रोड येथील रॉयल स्टोन बंगल्यात अहमदनगरच्या पांडुरंग वाघ या शेतकरी तरुणाने मंगळवारी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तेथील सुरक्षारक्षकांनी त्याला अडवून ताब्यात घेतले. गावदेवी पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला गावी पाठवले.
वाघ यांनी २०१७ मध्ये एक जमीन शेती करण्यासाठी घेतली होती. नदीलगतच्या जमिनीतील वाळू उपसा करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली. परवानगी मिळण्यासाठी त्यांनी सरकारकडे ८ लाख ७२ हजार रुपये भरून २०१८ मध्ये परवाना मिळवला. मात्र स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे वाळू उपसा करता आला नाही. अखेर, पैसे परत मिळावे म्हणून, पाठपुरावा सुरू केला. मदतीसाठी मंगळवाऱी थोरात यांच्या बंगल्याकडे आले. वाघ यांनी बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात जाऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेला पेट्रोलचा डबा बाहेर काढून पेट्राेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना वेळीच थांबविले. घटनेची वर्दी लागताच गावदेवी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी वाघ यांचे समुपदेशन करून त्यांना गावी धाडले आहे.