मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची मागणी सुरू होती. महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला होता. यावर काल केंद्र सरकारनेही नामकरणाला मंजुरी दिली आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असं या नावांना मंजुरी दिली आहे. दरम्यान, या निर्णयावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. तर अहमदनगरच्या नामांतराचीही मागणी केली आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नामांतरावरुन शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहे, आणि अहमदनगरचे नामांतर 'अहिल्यानगर' देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारच असा विश्वासही व्यक्त केला आहे.
'श्रेयवादात पडणार नाही, यासाठी केंद्र सरकारचे आभार', चंद्रकांत खैरे यांची पहिली प्रतिक्रिया
"औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात होणारच, असं ट्विट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
महाविकास आघाडीचे सरकारने अगोदर औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनेही या संदर्भात निर्णय घेतला, आणि केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर काल केंद्राने मंजुरी दिली.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. तसंच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे. ट्विटवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.