Join us

एक्स्प्रेस वेवर ‘एआय’ कॅमेऱ्याची करडी नजर; मुंबई-पुणे मार्गावर ‘आयटीएमएस’ कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 8:06 AM

नियम तोडल्यास मोबाइलवर दंड पावती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अतिवेगाने वाहने चालवल्याने अपघातांत अनेकांचे बळी गेले आहेत. तसेच, अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे हे अपघात कमी व्हावेत, तसेच वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी विविध यंत्रणांकडून प्रयत्न सुरू होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. या महामार्गावर बसविलेली आयटीएमएस यंत्रणा आता कार्यान्वित झाली असून, वाहतुकीच्या १७ प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)वर आधारित कॅमेरे आणि रडार यंत्राद्वारे तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

 आयटीएमएस यंत्रणेसाठी लोणावळ्यातील कुसगाव येथे कमांड कंट्रोल सिस्टम आणि डाटा सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर येत्या काळात बोरघाट येथील पोलिस चौकीच्या भागात पाहणी केंद्राची उभारणी केली जाणार आहे. 

 तळेगाव आणि खालापूर येथील टोलनाक्यांवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारण्याचे काम सुरू असून, ही यंत्रणा ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल. त्यानंतर या महामार्गावर संपूर्ण भागात ऑक्टोबर २०२४ पासून आयटीएमएस यंत्रणा सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे १७ नियमभंग कॅमेरा टिपणार ओव्हरस्पीडिंग, सीट बेल्टचा वापर न करणे, महामार्गावर गाड्या उभ्या करणे, बोगद्यात गाडी उभी करणे, महामार्गावर दुचाकी चालविणे, लेनचे नियम तोडणे, मोबाइलवर बोलत गाडी चालविणे, टेललाइट रिफ्लेक्टर नसलेले वाहन, अनधिकृत नंबर प्लेटचा वापर, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, आदी नियमभंग कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार आहेत. 

आयटीएमएस यंत्रणेमुळे नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होईल. एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अतिवेगाने वाहने चालवल्याने अपघातांत अनेकांचे बळी गेले आहेत. तसेच, अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे हे अपघात कमी व्हावेत, तसेच वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी विविध यंत्रणांकडून प्रयत्न सुरू होते. आता त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गावर आयटीएमएस यंत्रणा बसविली आहे. पुणे ते मुंबईदरम्यान संपूर्ण महामार्गावर आता कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताच थेट दंडाची पावती वाहनमालकाच्या मोबाइलवर येणार आहे.

टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेपोलिस