तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली माहिती
सीमा महांगडे
मुंबई : गणित आणि भौतिकशास्त्र विषय अभियांत्रिकी पदवीसाठी अनिवार्य करायचे की नाही याबाबतचा निर्णय संबंधित राज्य सरकार, विद्यापीठे किंवा शिक्षण मंडळ यांनी घ्यावा, असे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीईने) त्याची जबाबदारी राज्यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यामुळेच या निर्णयाचा तज्ज्ञांमार्फत सखोल अभ्यास करून मगच त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांनी स्पष्ट केले आहे. म्हणूनच यंदाच्या शैक्षणिक वर्षात या निर्णयाची अंमलबजावणी शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे पदवी, पदविकेसाठी दोन-चार वर्षे नियोजन करून प्रवेश घेतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या संधीचा निर्णयही योग्य ते नियोजन आणि अभ्यास करून घेणे आवश्यक असल्याचे वाघ यांनी अधोरेखित केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इतर शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीची दालने खुली केली असल्याचा दावा एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी केला आहे.
एआयसीटीईच्या निर्णयानंतर डॉ. अभय वाघ यांनी अध्यक्षांशी संवाद साधला. त्यावेळी एआयसीटीईने या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्यांच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडे व सरकारकडे सोपविल्याचे एआयसीटीईने स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राचा अभ्यास करून प्रवेश घेतला आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये. तसेच, या निर्णयामुळे कोणत्या अडचणी येऊ शकतील, त्यातून मार्ग कसा काढायचा हे ठरले की मगच अंमलबजावणीचा निर्णय होऊ शकेल, असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
चौकट
अभियांत्रिकीतील अनेक शाखांसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय पाया आहेत. त्यामुळे हे विषय अभियांत्रिकीतून वगळले असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, टेक्स्टटाईल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, सिरॅमिक्ससारख्या शाखांतील अभ्यासात हे विषय आवश्यक नाहीत. कॉम्प्युटर सायन्ससारख्या विषयांत प्रोग्रॅमिंग भाषा महत्त्वाची असते, अशा शाखांतील शिक्षणासाठी लवचिकता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या त्या राज्यांतील प्रवेश प्रक्रियांसाठी जेईई , सीईटीसारख्या प्रवेश प्रक्रियांचे महत्त्व अबाधित राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणिताचे अभियांत्रिकीमधील महत्त्वही कायम राहील.
- अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई