पाच वर्षांत एड्सच्या रुग्णांत ४२ टक्क्यांनी घट; एड्स नियंत्रण सोसायटीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 03:16 AM2019-12-01T03:16:10+5:302019-12-01T03:16:21+5:30

२०१५ साली ७ हजार ५२६ रुग्णांना तर २०१६ साली ६ हजार ६६३ रुग्णांना एचआयव्हीची लागण झाली होती.

AIDS patients decline by 5% in five years; Information of the AIDS Control Society | पाच वर्षांत एड्सच्या रुग्णांत ४२ टक्क्यांनी घट; एड्स नियंत्रण सोसायटीची माहिती

पाच वर्षांत एड्सच्या रुग्णांत ४२ टक्क्यांनी घट; एड्स नियंत्रण सोसायटीची माहिती

Next

मुंबई : मुंबई शहर-उपनगरातील एड्सच्या प्रमाणात ४२.२ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने दिली. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत शहरातील रुग्ण कमी झाल्याचे निरीक्षण सोसायटीने नोंदविले आहे. २०१४ मध्ये ८५९३ रुग्णांना एचआयव्हीचे निदान झाले होते, ही संख्या २०१९ मध्ये ४ हजार ९६४ वर आली आहे.
एड्स नियंत्रण सोसायटीच्या माहितीनुसार, असुरक्षित शरीरसंबंधातून पसरणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण यात जास्त असून, नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी जवळपास ९३ टक्के रुग्णांना याच कारणामुळे संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच नव्याने निदान झालेल्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाणही जास्त आहे. बाधितांपैकी ७६.८ टक्के रुग्ण १५ ते ४९ वयोगटातील आहेत, यात ३६ टक्के स्त्रिया आहेत. २०१५ साली ७ हजार ५२६ रुग्णांना तर २०१६ साली ६ हजार ६६३ रुग्णांना एचआयव्हीची लागण झाली होती. २०१७ मध्ये ५ हजार ८२६ आणि २०१८ मध्ये ५ हजार २२० रुग्णांना एचआयव्हीची लागण झाली होती. त्या तुलनेत यंदा एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे निरीक्षण सोसायटीने मांडले आहे.
याविषयी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांमध्ये ३.५ टक्के जणांना एचआयव्हीबाधित मातेकडून संसर्ग झालेला आहे, तर ०.१ टक्के रुग्णांना रक्तसंक्रमणाद्वारे आणि ०.१ टक्के रुग्णांना सुई किंवा अन्य उपकरणांच्या माध्यमातून बाधा झाली आहे. गेल्या काही वर्षांत जनजागृतीचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे, समाजातील तळागाळाच्या वंचित घटकांतही या आजाराविषयी संवेदनशीलता वाढली आहे. समाजातील मोठा घटक या आजाराविषयी सुरक्षा आणि औषधोपचार करण्यावर भर देत आहे, त्यामुळे एचआयव्हीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे.

जोखमीच्या घटकांतही प्रमाण कमी
एचआयव्हीवर नियंत्रण मिळविताना विशेषत: जोखमीच्या गटात म्हणजेच समलिंगी, तृतीयपंथी, वेश्याव्यवसाय या घटकांत सकारात्मक जनजागृती झाल्यामुळे गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे २६.४ टक्के, ३४.३ टक्के आणि ३७.६ टक्क्यांनी एचआयव्हीमध्ये घट झाली आहे.

Web Title: AIDS patients decline by 5% in five years; Information of the AIDS Control Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई