मुंबईत ‘आॅइल गँग’ सक्रिय ; महागड्या गाड्या लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:00 AM2018-03-01T03:00:58+5:302018-03-01T03:15:16+5:30
‘थांबा... तुमच्या गाडीतून आॅइल सांडतेय, धूर निघतोय’ असा सावधानतेचा इशारा करायचा. गाडी तपासणीसाठी चालक खाली उतरताच गाडीतून किमती ऐवज घेऊन पसार होणारी ‘आॅइल गँग’ मुंबईत सक्रिय झाली आहे.
मनीषा म्हात्रे
मुंबई : ‘थांबा... तुमच्या गाडीतून आॅइल सांडतेय, धूर निघतोय’ असा सावधानतेचा इशारा करायचा. गाडी तपासणीसाठी चालक खाली उतरताच गाडीतून किमती ऐवज घेऊन पसार होणारी ‘आॅइल गँग’ मुंबईत सक्रिय झाली आहे. गेल्या आठवड्यात अशा प्रकारे लूट झाल्याच्या पाच घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे. यामध्ये भीमसेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह बड्या व्यावसायिकांच्या गाडीतूनही चोरी झाली आहे. त्यामुळे अशा टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
चेंबूर वाशी नाका परिसरात भीमसेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.आर. पांडियन कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या चार वर्षांपासून अमजद आखील पठाण (२३) त्यांच्याकडे चालक म्हणून काम करतो. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पांडियन यांना त्याने धारावी येथील कार्यालयात सोडले. पठाणने माहीम-सायन लिंक रोड परिसरात गाडी पार्क केली. त्याच दरम्यान एक तरुण तेथे आला. त्याने गाडीमधून तेल गळत असल्याची माहिती दिली. पठाणने खाली उतरून बोनेट तपासले. मात्र, कुठेही लिकेज आढळून आले नाही. पुन्हा गाडीत येऊन बसणार तोच गाडीतील लॅपटॉप, बॅग, पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही बाब पांडियन यांना समजताच त्यांच्या सांगण्यावरून पठाणने धारावी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
जुहू येथील व्यावसायिक
शीव रहेजा यांच्या बीएमडब्ल्यूमधूनही किमती ऐवज चोरीला गेला होता. २० तारखेला दुपारच्या सुमारास चालक दिलीप सौद हा रहेजा यांना घेऊन लोअर परळच्या फिनिक्स मॉलकडे आला. रहेजा मॉलमध्ये निघून गेल्यानंतर सौदने जवळच गाडी पार्क केली. दुपारी १च्या सुमारास एका लहान मुलाने गाडीतून आॅईल पडत असल्याची माहिती दिली. मात्र, तपासणीत काहीच आढळून आले नाही. ज्या मुलाने उपरोक्त माहिती दिली तोही गायब होता. सौद तत्काळ गाडीमध्ये आला. तेव्हा गाडीतील २० हजार किमतीची लेदर बॅग, लॅपटॉप, मोबाइल असा एकूण ७४ हजार किमतीचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
आठवडाभरात ५ घटनांची नोंद-
-२० तारखेला दादरमध्ये डॉ. दिलीप कानड यांच्या वाहनातून चोरी झाली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भेंडीबाजार जंक्शन येथून जात असलेले व्यावसायिक सुशील पारेख (६३), सरोश जाल (६६) यांनाही अशाच प्रकारे टार्गेट केले गेले.
-या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठवड्याभरात अशा स्वरूपाच्या ५ घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अशा स्वरूपाचे आणखीन गुन्हे दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांशी
साधा संपर्क...
रस्त्यात कुठेही गाडी थांबविण्यापूर्वी थोडा विचार करा आणि अशी संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना त्वरित कळवा.
अशी होते फसवणूक...
-एलबीएस मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, फ्री वे तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांना ही टोळी टार्गेट करते.
-यामध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येतो.
-गाडीतून आॅईल सांडण्याची माहिती देणारी व्यक्ती तेथून निघून जाते.
-चालक अथवा गाडीचा मालक गाडी तपासणीसाठी खाली उतरताच त्यांचा साथीदार गाडीतील किमती ऐवज घेऊन पसार होतो.
-ही टोळी बीएमडब्ल्यूसह किंवा तत्सम बड्या आणि महागड्या गाड्यांना आपले लक्ष्य बनवतेय.